(घाटंजी) यवतमाळ : शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या संतप्त नातेवाइकांनी तोडफोड केली. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील करोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिला रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान रुग्णालयातील नर्सने ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.
महिला रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने सीपॅप काढून व्हेंटिलेटर लावत असताना रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी टीव्ही, संगणकाचे मॉनिटर, दरवाजाच्या काचा फोडल्या. तसेच इतर साहित्याचेही नुकसान केले. रुग्णालयात काही वेळ तणाव होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.
या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली असून, या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितले.