चंद्रपूर : जंगलात शिकारीकरिता लावलेल्या फासात चक्क एक वाघ अडकला. परंतु ताकदीने वाघ पुढे निघाल्याने तो फास त्याच्या गळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपासून वाघाच्या गळ्यात फास असल्याने वनविभागाची धाकधूक वाढली आहे. अधिक दिवस फास वाघाच्या गळ्यात राहिल्यास त्याला शिकार करता येणार नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरोरा वनपरिक्षेत्रातील पळसगाव परिसरात काही दिवसांपासून वाघाचे वास्तव्य वाढले आहे. तीन दिवसांपूर्वी वन कर्मचाऱ्यास या भागात रक्त आढळून आले. वनविभागाच्या कॅमेऱ्यात वाघाच्या गळ्यात पट्टा असल्याचे दिसून आले. तो पट्टा बांधलेला असावा, असा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करून वनविभागाने संभ्रम वाढविला. याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, अधिक चौकशी केली असता वन्यप्राण्यांच्या शिकारीकरिता लावलेल्या फासामध्ये हा वाघ अडकल्याचे निष्पन्न झाले.
वाघाच्या गळ्यात पट्टा नसून तो फास आहे, ही बाब वन विभागाच्या लक्षात येताच मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली आहे. वाघाच्या गळ्यात असलेला फास जर घट्ट झाला, तर त्याला काही खाता येणार नाही. शिकारही करता येणार नाही. असाच तीन-चार दिवस राहिल्यास भुकेने मृत्युमुखी पडू शकतो. तो पट्टेदार वाघ मादी असून वयस्क असल्याची माहिती आहे.