चंद्रपूरची दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा विरोध करणारी भाजपा ‘मालपाणी’ ची पुरस्कर्ती: सचिन सावंत यांचा भाजपला टोला

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याच्या निर्णय घेतला आहे आणि भाजपाने अचानक घुमजाव करून या निर्णयाचा विरोध केला हे आश्चर्यकारक आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सदर निर्णयाचे समर्थन केले होते. त्यामुळे या राजकीय सोयीसाठी बदललेल्या भूमिकेतून भाजपाचा दुटप्पीपणा उघड झाला असून देवेंद्र फडणवीस यांच्याच व्याख्येनुसार भाजप, सुधीर मुनगंटीवार आणि स्वतः फडणवीस मालपाणीचे पुरस्कर्ते आहेत का? हा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, ‘भाजपा हा अत्यंत दुटप्पी पक्ष आहे. राजकीय संधीसाधूपणा करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी असते. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासंदर्भात भाजपातर्फे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आपल्या भाषणात स्पष्ट केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार चंद्रपूर येथे अवैध दारुचे कॉर्पोरेटायझेशन नेत्यांच्या माध्यमातून झाले असून सुधीर मुनगंटीवार यांना हा त्यांनी मंत्री असताना घेतलेल्या दारुबंदीच्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप होत असेल. फडणवीस यांनी त्यांच्याकडे अवैध दारुचे दरपत्रक असल्याचे सांगितले होते.

यापुढे जाऊन फडणवीसजी असेही म्हणाले होते की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला दारुबंदी उठवण्याचा निर्णय हे लोक घेऊ देणार नाहीत. सगळे अवैध दारुचे धंदे करणारे एकत्र येऊन दारुबंदीचे पुरस्कर्ते बनतील. त्यांनी पुढे सरकारला ही सूचना केली की प्रत्यक्षात हे सर्व दारुबंदीचे पुरस्कर्ते नसून मालपाणीचे पुरस्कर्ते आहेत. या सर्वांना मालपाणी मिळत आहे. फडणवीस यांच्या या स्वयंस्पष्ट निवेदनातून भाजपाने केलेल्या विरोधाचा हेतू आता स्पष्ट झाला आहे. दुर्दैवाने भाजपा बरोबर सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही या दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. या विरोधातून भाजपा ही मालपाणीची पुरस्कर्ती ठरली असून भाजपाला किती मालपाणी मिळते हे जनतेसमोर येणे आवश्यक आहे, असा टोला सावंत यांनी लगावला.