राष्ट्रसंताच्या कर्मभूमीत दारूबंदी कायम राहावी

0
181
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• गोंदेडा (गुंफा) समितीच्या बैठकीत एकमताने ठराव पारीत

• दारूबंदी समर्थक राजकीय नेत्यांचा बैठकीतून निषेध

• राष्ट्रसंतांचे अनुयायी जिल्हाभर दारूबंदीचे फायदे
सांगणार

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदेडा (गुंफा) तपोभूमीत दारूबंदी कायम करण्याचा ठराव पारित करण्यात आला. तपोभूमी गोंदेडा (गुंफा) समितीचे अध्यक्ष विठ्ठल सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली, यात हा निर्णय घेण्यात आला.

चिमूर तालुका हा राष्ट्रसंताची कर्मभूमी आहे. या भूमीत राष्ट्रसंतांनी व्यसन मुक्ती,दारूमुक्ती साठी आपल्या भजन व प्रबोधना द्वारे जीवाचे रान केले, हा इतिहास आहे. अनेक संघटनांच्या, कार्यकर्त्यांच्या, आणि सामान्य माणसाच्या सर्व जनतेच्या अथक प्रयत्नांनी चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2014 पासून राज्य सरकारने संपूर्ण दारूबंदी केली. त्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित झाली. मात्र सन 2020 – 2021 या वर्षांमध्ये जिल्हातील दारू बंदी उठविण्यासाठी काही राजकीय नेते मोठ्या प्रमाणात हालचालीकरीत आहेत. परंतु दारूच्या व्यसनाने कुठले दुष्परिणाम होतात हे त्यांना दिसत नाही का, असा प्रश्न या सभे मध्ये उपस्थित केला गेला. दारूच्या व्यसनाने समाजावर अनेक दुष्परिणाम होतात. कुटुंबातील संपत्तीचा नाश होतो,भांडणे वाढतात, रोगराई निर्माण होते,शील भ्रष्टता वाढते, अश्लील वर्तणूक निर्माण होते,बुद्धीचा नाश होतो, वेळेचा अपव्यय होतो,पाल्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते, चोरीचे प्रमाण वाढतात, कौटुंबिक हिंसाचार आणि कलह निर्माण होतात.आणि यातून खुनाचे प्रकरण वाढतात. वाहन अनियंत्रित मुळे अपघात होतात. आत्महत्या चे प्रमाण वाढतात. समाजात मानहानी होते, स्त्रियांना मानसिक व शारीरिक त्रास होतात,पोलीस व इतर शासकीय यंत्रणेवर दबाव व त्रास निर्माण होतो, शासकीय यंत्रणा कोलमडून जाते, आदी दुष्परिणाम दारूच्या व्यसनाने असताना जिल्ह्यातील काही वजनदार राजकीय नेते शासनाचा महसूल बुडत असल्याचा कारण पुढे करून चंद्रपुरातील दारुबंदी हटविण्यासाठी षड्यंत्र करीत असल्याचा आरोप सभेत करण्यात आला.
परंतु नुसत्या दारूच्या महसूल नी राज्य आणि देश चालत नाही,शासनाला चालवायला अनेकप्रकारचे महसूल आहेत.दारूच्या महसुलाची नावे पुढे करून आपण समाजातील मानव जात नष्ट करीत आहोत.तेव्हा दारुबंदी कायम राहिली पाहिजे, असा ठराव पारित करण्यात आला.

दारू समर्थक राजकीय पुढाऱ्यांचा श्री गुरुदेव सेवा मंडळ व अनेक सामाजिक सेवाभावी संस्था निषेध करीत आहेत; आणि दारुबंदी कायम राहावी यासाठी ठराव पारित करून शासनाला जागृत करीत आहेत.तसेच प्रत्येक गावात दारुबंदी कायम असावी असे ठराव पारित करावे आणि शासनाला पाठवावे असे आवाहन या सभेत करण्यात आले. या सभेला दामोदर दडमल, सिद्धाराम ननावरे, पांडुरंग अडसोडे, दिलीप बन्सोड आणि अनेक गुरुदेवभक्त उपस्थित होते.