वेकोलि क्षेत्रीय योजना अधिकाऱ्यावर कारवाईसाठी मुख्य महाप्रबंधक कार्यालयापुढे ठेवला मृतदेह

0
754
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• वेकोली अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासापोटी मुलीने आत्महत्या केल्याचा कुटूंबियांचा आरोप

चंद्रपूर : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पौनी -3 कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्त 19 वर्षीय युवतीने नोकरीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी वेकोली प्रशासनाने दिलेल्या त्रासापोटीच आत्महत्या केल्याचा आरोप वडीलांनी केला असून वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राच्या मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर मृतदेह ठेवून क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आशा तुळशीराम घटे (रा. सास्ती) असे मृत युवतीचे नाव आहे.

राजुरा तालुक्यातील साखरी येथील तुळशीराम घटे यांची शेतजमिन वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पौनी-3 कोळसा खाणीकरीता अधिग्रहीत करण्यात आली. तुळशिराम घटे यांच्या परिवारात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे सदस्य आहे. वेकोलीत शेतजमिन गेल्यामुळे मोल-मजूरी करून उदरनिर्वाह करीत सास्ती येथे जिवन जगत आहेत.

शेतजमिनीच्या अधिग्रहाचा मोबदला मिळाला परंतू नोकरी साठी मागील अनेक दिवसांपासून वेकोली प्रशासन विविध कागदपत्रांसाठी तगादा लावून नाहक त्रास देत होते. वडीलांचे वय जास्त असल्याने मुलीला नोकरी देण्याकरीता तश्या आशयाचे आवश्यक कागदपत्र वेकोली प्रशासनाकडे सादर केले होते. परंतू वेकोली प्रशासनाकउून नोकरी देण्यास टाळा-टाळ करण्यात येत होती. दरम्यान, 22 मार्च रोजी वेकोली चे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांनी घटे कुटूंबियांना कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी कार्यालयात बोलविले. संपूर्ण कुटूंब कार्यालयात गेले असता कागदपत्रांची पुर्ततेसंबंधी विचारणा करण्यापेक्षा कुटूंबातील वैयक्तीक प्रश्नावरून मुलीला विचारणा करून त्रास दिला. अपमानास्पद वागणूक देऊन घरी परत पाठविल्याचा आरोप घटे कुटूंबियांनी केला आहे. वेकोली प्रशासनाचा या वागण्यामुळे घटे कुटूंबियाना मानसिक त्रास सुरू होता.

यातच 23 मार्च 2021 ला मुलगी आशा हिने वेकोलीच्या त्रासापायी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विषप्राशन केल्याचे लक्षात येताच तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे मुलीला स्थानिक रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतू प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे 27 मार्च रोजी चंद्रपूर येथे खाजगी रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. तेथून जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. प्रकृतीत कोणताही सुधारणा न झाल्याने आज बुधवारी (31 मार्च) रोजी जिल्हा सामाण्य रूग्णालयात सकाळी 10 च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावर शवविचछेदन करून घटे कुटूंबियाना मृतदेह स्वाधीन करण्यात आले.

मुलगी आशा हिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी वेकोली प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत घटे कुटूंबीयांनी आज बुधवारी मुलीचा मृतदेह दुपारच्या सुमारास वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालयासमोर आणून ठेवला. आणि क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया हेच मृत्यूस जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर आज क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाला सुटी असल्याने अधिकारी कार्यालयाज नव्हते. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना मृतदेह घरी नेवून अत्यंसंस्कार करण्याचा सल्ला दिला. काहीवेळानंतर साखरी येथे आशा हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र घटे कुटूंबियांनी मुलीच्या मृत्यूस वेकोली प्रशासनाला जबाबदार धरले आहे.