हैद्राबाद : देशात करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अत्यंत वेगाने पसरली. यंदा बाधितांच्या संख्येबरोबरच मृतांचा आकडा देखील वाढल्याने चिंता वाढली आहे. विषाणूचा संसर्ग वाढण्यामागे त्याचा नवा अवतार कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशातच देशातील अनेक भागांमध्ये विषाणूवर प्रभावी ठरतील अशी औषधे बनवल्याचा दावा करण्यात येत असल्याचं दिसतंय. असाच दावा काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावातील वैद्याने केला होता.
दरम्यान, या आयुर्वेदिक औषधाला प्रसिद्धी मिळवून देण्यामागे येथील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा व्हिडीओ कारणीभूत ठरला होता. एन कोठाय नामक या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने, ‘आनंदय्या नावाच्या वैद्याने तयार केलेला हरबल ड्रॉप घेतल्याने आपण करोना विषाणू बाधेतून अवघ्या दहा मिनिटांमध्ये ठणठणीत झालो.’ असा दावा केला होता.
तत्पूर्वी, एन कोठाय यांच्या करोना औषधाबाबच्या दाव्यानंतर आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात करोनावरील आयुर्वेदिक औषधासाठी हजारोंची गर्दी जमली होती. झटक्यात कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करीत होते.
मात्र, एन कोठाय यांचेच आज करोनामुळे निधन झाल्याने करोना झटक्यात बरा करण्याचा दावा करणाऱ्या औषधाचा फज्जा उडाला आहे.