• डॉ. सोनारकर यांना दिला पहिला डोज
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये आज शनिवार 16 जानेवारी 2021 ला कोविड -19 चा अंत करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील सहा केंद्रावरून लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वात पहिला लसीकरणाचा डोज डॉ. सोनारकर यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचरलावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वळखेळकर, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गलहोत, आय.एम. ए चे अध्यक्ष अनिल माडूलवार यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात 16 जानेवारीला चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्रात तसेच वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा येथील सहा केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. कोविशिल्ड या लसीची पहिली डोज आरोग्य सेवेतील 9 हजार कर्मचा-यांना देण्यात येणार आहे. 28 दिवसानंतर या लसीचा दुसरा डोज दिल्या जाणार आहे.
यावेळी कोविड 19 ला पराजय करण्याची हि मोहिम अधिकारी व कर्मचा-यांच्या उत्तम नियोजनातुन 100 टक्के यशस्वी होणार असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या तयारीची माहिती जाणून घेत लसीकरण नियोजनाचे कौतूक केले. आजवरची ही सर्वात मोठी मोहिम असून ती यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह संबधीत सर्व विभाग युध्द पातळीवर काम करत आहे. या मोहिमेत शासन स्थळावर येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आम्हीही कटिबध्द असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीलते.