तिस-या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ॲक्शन प्लॉन’ – जिल्हाधिकारी गुल्हाने

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेनंतर आता तिस-या लाटेशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. पहिल्या दोन लाटेचा अनुभव लक्षात घेता भविष्यात कोव्हीडच्या उपाययोजनेसंदर्भात आणखी सुक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तिस-या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ॲक्शन प्लॉन’ तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात सर्व तालुकास्तरीय यंत्रणेचा व्हीसीद्वारे आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियंका पवार-कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन नियोजन करीत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, सार्वत्रिक निवडणूक किंवा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्याकरीता ज्याप्रकारे ॲक्शन प्लॉन तयार केला जातो, त्याच धर्तीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा ॲक्शन प्लॉन तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याने इत्यंभूत माहिती आतापासून तयार करावी. यात आपापल्या तालुक्यातील खाजगी रुग्णालयांची संख्या, तज्ज्ञ डॉक्टरांची यादी, विलगीकरणासाठी लागणा-या शासकीय इमारती, खाजगी सभागृहे, मंगल कार्यालये, आतापर्यंत मोठमोठ्या खाजगी उद्योगांनी कोव्हीडमध्ये केलेली मदत, कोव्हीड केअर सेंटर, डेडीकेडेट कोव्हीड हेल्थ उभारण्यासाठी जागांचा शोध आदींचा समावेश असावा.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे टेस्टिंग होणे गरजेचे आहे. यात आयएलआय व सारीच्या रुग्णांची टेस्टिंग, पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो-रिस्क काँटॅक्ट, सुपर स्प्रेडर, नरेगाच्या बांधकामावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मजूर, गोसेखुर्दच्या बांधकाम साईड्स, विविध तालुक्यात असलेल्या मोठमोठ्या कंपन्यातील मजूरवर्ग यांचा समावेश असावा. तसेच नियमांचे उल्लंघन करून विनाकारण फिरणा-यांची टेस्टिंग व्हायलाच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

लसीकरणाच्या फेक मॅसेजला बळी पडू नका : कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये लसीकरण हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. शास्त्रज्ञांनी तयार केलेली लस ही अतिशय सुरक्षित आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच वरीष्ठ अधिका-यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोव्हीड प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यामुळे इतरही पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत:हून समोर यावे. तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांनी तीन महिन्यांनी लस घ्यावी. तसेच बाळांना दूध पाजणा-या मातांसाठी सुध्दा लस अतिशय सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्ती रक्तदान करू शकतात.

लसीकरण झाल्यानंतर एखाद्याला गंभीर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे समाज माध्यमातून लसीकरणासंदर्भात पसरविण्यात येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

लसीकरणाला गती देण्यासाठी प्रत्येक तालुक्याने जाणीव – जागृती करावी. स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनामार्फत गावस्तरावर लसीकरण आणि सर्व्हेक्षण समितीचे नियोजन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला व्हीसीच्या माध्यमातून सर्व तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी (न.प), गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित होते.