करोनाचं तांडव ! एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

भंडारा : राज्यात करोना संसर्गाच्या दुसरे लाटेने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र करोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त करणाऱ्या करोनाने भंडारा जिल्ह्यातील एका कुटुंबातील तिघांचा बळी घेतल्याचे समोर आला आहे.

भंडारा तालुक्यातील माटोरा गावात एका कुटुंबातील तीन सदस्यांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाला. त्यामुळे बोरकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ह्या एका घटनेनं पूर्ण जिल्हा हादरुन गेला. महादेव बोरकर(90), पार्वताबाई बोरकर (85) आणि मुलगा विनायक बोरकर ( 55) अशी मृतांची नावं आहेत. बोरकर यांच्या कुटुंबातील सात सदस्यांपैकी तिघांना करोनाची लागण झाली होती. लागण झालेले तिघेही करोनाचे बळी ठरले.

महादेव बोरकर हे सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांच्यावर करोनाचे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून नातेवाईक घरी परतत असतानाच त्यांची पत्नी पार्वताबाईंचं करोनाने निधन झालं. त्यामुळे नातलगांनी लगोलग त्यांचावर अंत्यसंस्कार केले.

दोघा पती-पत्नीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही वेळातच त्यांचा मुलगा विनायक बोरकर यांची ऑक्सिजन पातळी खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांच्यावरही अंत्यसंस्कार केले. काही तासांच्या अंतराने करोनाने कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली. विनायक बोरकर यांच्या पाठिमागे पत्नी आणि तीन मुलं आहेत.