ताडोबाच्या मुख्य मार्गावर दोन वाघांचे दर्शन, प्रवाशांचा अडविला रस्ता : Video Viral

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जिल्ह्यात केव्हा कुठे वाघाचे दर्शन होईल हे सांगता येत नाही. अशातच दोन वाघांनी वाहनाने जाणाऱ्या काही लोकांचा रस्ता अडविल्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला.

या व्हिडिओची शहानिशा केली असता तो दुसरीकडील नसून ताडोबाच्या मुख्य मार्गावरील असल्याच्या बाबीला मोहर्ली वनपरिक्षेत्राधिकारी आर. मून यांनी दिला. ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घडली. चंद्रपूरहून ताडोबाकडे जाणाऱ्या मार्गावर आगरझरी परिसरात दोन वाघ रस्त्याने येत असल्याचे दिसताच दोन्ही बाजूची वाहने जागीच थांबली. दोन्ही वाघ आरामात दुचाकीस्वारांकडे येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

काहींनी वाघ आपल्याकडे येत असल्याचे पाहून वाहने मागे घेतली तर एक दुचाकीस्वार वाघ जवळ येत असताना तिथेच थांबून बघत असल्याचे दिसून येते. ही मंडळी लगतच्या गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कोणीतरी या घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने ही बाब पुढे आली.

ताडोबा परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांना सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते पाच या परिसरातून जाण्याची मुभा असल्याचे समजते. ही घटना दरम्यानच्या काळातील असल्याचे मोहर्ली वनपरिक्षेत्राधिकारी आर. मून यांनी स्पष्ट केले.