नांदेड : स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटायला निघालेल्या नवरदेवावर काळाने घाला घातला. पाचच दिवसावर लग्न असताना ही दुर्देवी घटना घडलीय. आज सकाळी भोकर – बारड रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. उत्तम शिराणे असे या नियोजित वराचे नाव आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कांडली येथील उत्तम शिराणे या तरुणाचा विवाह लोहा तालुक्यातील तरुणीशी येत्या ५ एप्रिल रोजी होणार होता. मात्र, लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या उत्तमला अज्ञात वाहनाने धडक दिले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
महामार्ग पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्धापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात वाहनचालक विरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लग्नाच्या पाचच दिवस अगोदर उत्तमला काळाने गाठल्याने नियोजित वर आणि वधुच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.