कोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद!

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललं आहे. दुसऱ्या लाटेमुळे मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच कोरोना लसीमुळे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे.

8 मार्च 2021 रोजी लसीकरणानंतर एका 68 वर्षीय व्यक्तीचा एनाफिलेक्सिसमुळं मृत्यू झाला. लसीकरणानंतर एखाद्या व्यक्तीला झालेल्या कोणत्याही त्रासाला एईएफआय म्हणजेच एडवर्स इवेंट फॉलोइंग इम्युनाइजेशन असे म्हटले जाते. सरकारकडून अशा एईएफआयच्या प्रकरणांसाठी एक समिती स्थापन केली आहे.

सरकारकडून नेमलेल्या समितीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर उद्भवलेल्या 31 गंभीर घटनांचा अभ्यास केला आणि यापैकी केवळ 1 मृत्यू हा लसीकरणामुळं झाल्याचं मान्य करण्यात आले आहे. त्यामुळं अधिकृतरित्या एका व्यक्तीचा मृत्यू कोरोना लस घेतल्यामुळं झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणही सुरु करण्यात आलं आहे. मात्र आता कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना नोंदली गेली आहे.

दरम्यान, लसीकरणानंतर प्रकृतीवर प्रतिकूल परिणामाच्या 26 हजार 200 केसेसची नोंद देशात झाली. यातील केवळ 488 रुग्णांचा मृत्यू झाला. 23 कोटी 50 लाख डोस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ 0.01 टक्के इतकी अत्यल्प आहे. यावरून लस घेणे सुरक्षितच असल्याचा मुद्दा अधोरेखित झाला.