मनपाच्या झोन सभापतींची निवड ऑफलाईन होणार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

तिन्ही प्रभाग समितीसाठी एकूण १७ कोरे नामनिर्देशन पत्रांची विक्री

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीनच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी नियोजित विशेष सभा ऑफलाईन (प्रत्यक्ष उपस्थिती) होत आहे. येत्या पाच ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. दरम्यान, कोरे नामनिर्देशन पत्रांची विक्रीच्या अखेरच्या दिवशी एकूण १७ फॉर्मची विक्री झाली. उद्या ता. ४ ऑगस्ट नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९ अ-(४) अन्वये विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूरचे पत्र क्रमांक एमयुएन/१९/(२) कावि- २०५/२०२१ दि. २६ जुलै २०२१ अन्वये २०२१-२२ साठी चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीन मधील सदस्यांतून प्रभाग समिती सभापती यांची निवड करण्यासाठी विशेष सभा ता. ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. ही सभा ऑनलाईन होणार होती. मात्र, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांचे पत्र क्रमांक एमयुएन/१९/(२) कावि- २०१६/२०२१ दि. २ ऑगस्ट २०२१ अन्वये ही सभा प्रत्यक्ष उपस्थितीत ऑफलाईन होणार आहे.

प्रभाग समिती एकसाठी सकाळी ११ वाजता, प्रभाग समिती दोनसाठी दुपारी १२ वाजता, प्रभाग समिती तीनसाठी दुपारी १ वाजता सभा होत आहे. दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगर सचिव यांच्या कार्यालयातून १७ कोरे नामनिर्देशन पत्राची विक्री झाली. प्रभाग समिती एकसाठी ५, प्रभाग समिती दोनसाठी ५, प्रभाग समिती तीनसाठी ७ नामनिर्देशन पत्राची विक्री झाली.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख उद्या ता. ४ ऑगस्ट आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगर सचिव यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. पाच ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी विशेष सभा सुरु झाल्यावर होईल. छाननीनंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर त्याच दिवशी आवश्यकता भासल्यास सर्व नगरसेवकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत मतदान होईल, अशी माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या नगर सचिवांनी दिली आहे.