• लाखोंचे नुकसान; आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
• जिनींग मजुरांची आग विझविण्यासाठी धडपड
चंद्रपूर : गोंडपिपरी – चंद्रपुर या महामार्गावरील धानापूर गावा लगतच्या रास बिहारी कापूस जिनिंगला आज गुरूवारी (४ मार्च) ला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लाखोंचे नुकसान झाले असून आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिक जिनिंग मधील मजूर यांनी धडपड करून आणि अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. अचानक लागलेल्या आगीचे कारण कळू शकले नाही.
गोंडपिपरी तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने तालुक्यात एकूण चार कापूस खरेदी केंद्र आहेत. यापैकीच एक असलेल्या चंद्रपूर – अहेरी मार्गावरील धानापूर या गावा लगत असलेल्या रास बिहारी कॉटन इंडस्ट्रीज या जिनिंगला आज गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. आगीची तीव्रता प्रचंड असल्याने जिनिंग मधील मजुरांची तारांबळ उडाली व आरडाओरड सुरू झाली. या घटनेची माहिती पसरताच लगतच्या चेक वेंकटपुर गावातील नागरिक मजुरांच्या हाकेला धावून येत आग विझवण्यासाठी धडपडू लागले होते. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने जिनिंग व्यवस्थापक व मालकाने तातडीने भ्रमणध्वनीवरून पोलीस प्रशासन तथा चंद्रपूर फायर ब्रिगेड राजुरा व बल्लारशा फायर ब्रिगेड दलाला पाचारण केले. मात्र अग्निशमन दल दाखल होण्यापूर्वीच लाखोंचा कापूस जळून खाक झाला. लागलेल्या आगीत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नसून खरेदी केलेल्या कापूस साठ्यामध्ये बहुतांश कापूस जळाल्याने जिनिंग मालकाचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
गोंडपिपरी येथे अग्निशमन वाहनाची गरज
तालुक्यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असुन दिवसेंदिवस वाढतच असल्याने मागील तीन ते चार वर्षाच्या काळात येथे चार कापूस केंद्र अस्तित्वात आले. या सर्वच कापूस खरेदी केंद्रावर हंगामात प्रचंड गर्दी राहत असून मुबलक प्रमाणात कापूस खरेदी केला जातो. एवढे असतानाही गोंडपिपरी शहर पातळीवर अद्यापही अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्याने आगीच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस य45 किमी अंतरावर असलेल्या राजुरा बल्लारशा अथवा 60 किमी अंतरावर असलेल्या चंद्रपूर येथून आग विझविण्यासाठी पाचारण करावे लागते. तरी शासनाच्या वतीने नगरपंचायत स्तरावर अग्निशमन वाहन सेवा सुरू करण्याची मागणी या घटनेच्या निमित्ताने नागरिकांनी केली
आहे.