मनपातील सत्ताधाऱ्यांचे गैरवर्तन व भ्रष्टाचारा विरुद्ध कारवाई करणार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे शहर विकास आघाडीच्या शिष्टमंडळाला आश्वासन

चंद्रपूर : दिनांक 29 जुलै 2021 रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या आमसभेत महापौर राखी कंचर्लावार यांनी विरोधकांवर दोन वस्तू फिरकावल्या. तसेच मनपाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी विरोधकांना अश्लील शिवीगाळ करून धमकावले.या सभेनंतर महापौरांचे पती असलेले नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी उपायुक्त विशाल वाघ यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली.मात्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 12 नुसार महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व उपमहापौर यांचे वर्तन नियमबाह्य असतानाही त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी शासनाला पाठवला नाही. या पदाधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने महानगरपालिका अधिनियम कलम 13 मधिल पोटकलम 1(अ) च्या तरतुदीनुसार निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शहर विकास आघाडीने केली होती.

याबाबत शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख व नगरसेवक दिपक जयस्वाल यांनी आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य सुध्दा उपस्थितीत होते. नगर विकास राज्यमंत्री तनपुरे यांच्या सोबत शिष्टमंडळाने सुमारे अर्धा तास चर्चा केली.

मनपातील कचरा संकलन घोटाळा, प्रसिद्धीच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळा, टॅक्स मूल्यांकनाच्या निविदेतील भ्रष्टाचार तसेच भोजन पुरवठा घोटाळा व दलित वस्ती निधीचा दुरुपयोग इत्यादी भ्रष्टाचाराबाबत सविस्तर माहिती नगर विकास राज्यमंत्री यांना देण्यात आली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे स्थायी समिती अध्यक्ष रवि आस्वानी तसेच नगरसेवक संजय कंचर्लावार यांची गैरवर्तणूक व भ्रष्टाचार याबाबत अहवाल मागवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहर विकास आघाडीच्या शिष्टमंडळाला दिले.