चंद्रपूर शहरात जादुटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबीयातील चौघांना मारहाण ; सहा जणांना अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : जादुटोणा केल्याच्या कारणावरून शहरातील भिवापूर वॅार्डातील एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकिस आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. अटकेतील सगळ्या आरोपींना शनिवारी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

चंद्रपूर शहरातील भिवापूर वॅार्डात नारायण पदेमवार आणि राम पदेमवार कुटुंबीय राहतात. हे दोघेही भाऊ आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रामू पदेमवार यांना मुखाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, आजार कमी होत नसल्याचे पाहून त्यांनी मांत्रिकाचे घर गाठले होते. कर्करोगाला तुमच्या परिवारातील काहीजण कारणीभूत असल्याचे वारंवार मांत्रिकाने सांगितले होते. तेव्हापासून राम पदमेवार यांचा नारायण पदेमवार यांच्यावर संशय वाढला होता.

शुक्रवारी (ता. ३) सकाळी राम पदेमवार यांच्या काही नातेवाईकांनी नारायण पदेमवार यांचे घर गाठले. जादुटोणा केल्यामुळे राम पदेमवार यांना कर्करोग झाल्याचे सांगून आशालू पदेमवार, सिनू रादंडी, रवी आशावर, मंगेश पदमेवार यांनी पूजा नारायण पदमेवार, नारायण पदमेवार, भाऊ आणि बहिणीस बेदम मारहाण केली. याप्रकारानंतर पूजा पदमेवार हिने शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. प्रारंभी पोलिसांनी हे प्रकरण गांर्भीर्याने घेतले नाही. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांच्या कानावर हा प्रकार आला. त्यांनी शहर पोलिस स्टेशन गाठले.

त्यानंतर पोलिसांनी परत पीडीत कुटुंबीयांन बोलावून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर आशालू पदेमवार, सिनू रादंडी, रवी आशावर, मंगेश पदमेवार यांच्यासह एकास अटक केली.