‘जन विकास’च्या दणक्यानंतर ‘तो’ वादग्रस्त नोटीस २४ तासात मागे

0
556
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

डॉ सोनारकर यांनी अधीक्षकांच्या खुर्चीचा अवैध ताबा सोडावा

पप्पू देशमुख यांनी रुग्णालयात लावला नोटीस

चंद्रपूर : शासकीय रुग्णालयातील अधिक्षक डाॅ. निवृत्ती जिवने यांची सही असलेला व आंदोलन करणाऱ्या कामगारांना 24 तासात रुजू होण्याचे आदेश देणारा नोटीस रुग्णालय प्रशासनाने २४ तासाच्या आत मागे घेतला. या नोटीस नंतर जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी डाॅ.भास्कर सोनारकर यांना शहरात फिरकू देणार नाही असा इशारा दिला होता. त्यामुळे आज दवाखान्याच्या आवारात दिवसभर दंगा पथकासह पोलिसांचा मोठा ताफा लावण्यात आला होता. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंभोरे यांनी जन विकास चे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना आज दुपारी १ वाजता चर्चेसाठी बोलावले. शासकीय रुग्णालयाच्या नोटीसमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे रूग्णालय प्रशासनाविरुद्ध कारवाई करण्याबाबत पोलीस विभागाने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असुन रुग्णालय प्रशासनाला ‘तो’ वादग्रस्त नोटीस काढून टाकण्याचे आदेश दिल्याची माहिती सुद्धा पोलीस निरीक्षक आंभोरे यांनी देशमुख यांना दिली. मात्र जन विकास सेनेच्या दंडा लेकर हल्लाबोल आंदोलनाचा धसका घेतलेल्या प्रशासनाने आज दिवसभर मोठा बंदोबस्त याठिकाणी ठेवला होता.

दरम्यान एक खळबळजनक माहिती याबाबत समोर आलेली आहे. शासकीय रुग्णालयाच्या अधीक्षक पदाचा अधिभार सद्यस्थितीत डॉ निवृत्ती जीवने यांच्याकडे आहे.परंतु डाॅ. सोनारकर बळजबरीने अधीक्षक कार्यालयामध्ये अधीक्षकांच्या खुर्चीवर बसतात. डॉ जीवने यांना अधीक्षकांच्या खुर्चीवर बसू देत नाहीत. तसेच याची पूर्ण कल्पना असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अरुण हुमणे त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई करीत नाही. २४ तासाच्या आत कामगारांना रुजू होण्याचे आदेश देणारा नोटीस सुद्धा डाॅ.सोनारकर यांनी तयार करून दबाव टाकून डाॅ.जिवने यांची स्वाक्षरी घेतली अशी बाब आता समोर आलेली आहे. त्यामुळे पुढील २४ तासात डाॅ. सोनारकर यांना अधीक्षक पदाच्या खुर्चीवरील अवैध ताबा सोडण्याचे आदेश देण्याचे करावे .अन्यथा अधीक्षकांच्या खुर्चीवरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देणारा नोटीस जन विकासचे पप्पू देशमुख यांनी रुग्णालयातील मेट ऑफिस जवळ लावलेला आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. हुमने काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.