श्रमदानातून ग्रामदुतांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता

‘एक दिवस गावासाठी’ उपक्रम : नांदा येथील युवकांचा पुढाकार

कोरपना : ग्रामदुत फाउंडेशनच्या माध्यमातून नांदा येथे ‘एक दिवस गावासाठी’ या उपक्रमाअंतर्गत स्मशानभुमीची स्वच्छता करण्यात आली. नांदा येथील ग्रामदुत युवकांनी यासाठी विशेष पुढाकार घेवून श्रमदानातून शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

पावसाळ्यात स्मशानभुमीत झुडुपे वाढलेली होती. याचा त्रास अंत्यविधीसाठी येणा-यांना होत होता. बऱ्याच दिवसापासून स्मशानभूमीत अस्वच्छता पसरली होती. या पार्श्वभूमीवर गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा मानस गावकऱ्यांनी केला. ही बाब लक्षात घेवून शिक्षक दिनानिमित्त ग्रामदुत फाऊंडेशनचे प्रा.रत्नाकर चटप, प्रा.रुपेश विरुटकर, भास्कर लोहबडे, मुरलीधर बोडके, प्रमोद वाघाडे, प्रकाश महाराज उपरे, चंदू झुरमुरे, रवी चिंचोलकर, नितीन गिरटकर, रमेश गज्जलवार यांनी पुढाकार घेतला. स्वेच्छेने श्रमदानातून वाढलेली झुडपे तोडून स्मशानभुमीतील परिसर स्वच्छ करण्यात आला.

फाउंडेशनच्या माध्यमातून याआधी गावात वृक्षारोपण करण्यात आले होते. सोबतच राजूरा येथील विवेकानंद अनाथाश्रमात अनाथांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यापुढेही गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामविकासात योगदान दिले जाईल, असे ग्रामदुत फाऊंडेशनचे प्रकाश महाराज उपरे यांनी सांगितले.