स्वतःच्या रक्ताने बनविलेले थोर महात्म्यांचे पेंटिंग्ज जळून खाक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : स्वतः दिव्यांग असताना कर्मयोगी यांच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या एका शिक्षकाने स्वतःच्या रक्ताने थोर महात्म्यांचे पेंटिंग्ज तयार केले. घरात काटकसरीने आर्ट गॅलरी लावली. या गॅलरीला आग लागली. त्यात रक्ताने तयार केलेले पेंटिंग्ज भस्मसात झाले त्यामुळे महारांगोळीकार हतबल झाला आहे. ही घटना शनिवारी वरोरा येथे घढली आहे.

स्वतः दिव्यांग असताना त्याने कलेचा छंद असून तो जोपासला. कर्मयोगी बाबा आमटे यांच्या महारोगी सेवा समितीने आनंदवनातील मूकबधिर शाळेत कलाशिक्षक म्हणून प्रल्हाद ठक यांची नियुक्ती केली. कर्मयोगी बाबांच्या प्रेरणेने प्रल्हाद ठक प्रभावित झाले. त्यांनी चंद्रपूर पोलीस ग्राउंडवर महारांगोळी काढण्याचा विक्रम केला. यासोबतच स्वतःच्या रक्ताने थोर समाज सेवकांचे पेंटिंग्ज तयार केले. त्यांच्या आनंदवन चौक गजानन नगर स्थित असलेल्या गॅलरीला अचानक आग लागली आणि हे सर्व संपून गेले.

शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास खालच्या मजल्यावरील गॅलरीत धूर निघत असल्याचे त्यांना लक्षात आले. खाली जाऊन बघितले तर अर्धेअधिक चित्रे, रंग आणि रंग कामाचे साहित्य आगीने गिळंकृत केले होते. आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या कुटुंबीयांनी केला. मात्र तोपर्यंत सारे रंग काळवंडले होते.
चित्रांची किंमत आणि त्याचे झालेले नुकसान याचे मोल सांगता येणे कठीण आहे. तरी अंदाजे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. भिंतीचे रंग उजळतीलही मात्र स्व-रक्ताने रंगविलेले चित्र पुन्हा कसे उभे राहतील, असा यक्षप्रश्न प्रल्हाद ठक यांच्या पुढे उभा ठाकला आहे.

लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये झाली होती नोंद

आनंदवनातील मूकबधिर विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रल्हाद ठक या चित्रकाराची ओळख सातासमुद्रापलीकडे आहे. महारांगोळीकार ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले रंगकर्मी ठक यांनी स्वत:च्या रक्ताने समाजसेवक आणि क्रांतिकारकांचे काढलेले अनेक चित्र डोळ्यात भरण्यासारखे आहेत. याकरिता त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. पुणे येथील बालगंधर्व ते जे.जे. आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या चित्रांच्या प्रदर्शनी या त्यांच्यातील दमदार कलावंताची साक्ष देतात. रंग कलेचा हा आस्वाद वरोरा शहरातील नवोदित चित्रकारांना पथदर्शी ठरावा म्हणून त्यांनी ठक आर्ट गॅलरी हे दालन आपल्या घरीच इतरांकरता मोकळे केले. त्या ठिकाणी कॅनव्हास पेंटिंग, ॲक्रेलिक पेंटिंग, पोस्टर कलर पेंटिंग येथपासून तर स्वतःच्या रक्ताने कुंचल्यांना आकार देत रंगविलेले अनेक क्रांतिकारकांचे चित्र हे सर्व आर्ट गॅलरी रसिकांची दाद मिळवत होते. एवढेच नव्हे, तर एखाद्या हौशी कलावंताला कुंचला हातात घेऊन रंग भरावे असे वाटले तर तीही सोय त्यांनी गॅलरीत केली होती. उभ्या लाकडी स्टँडवर लावलेला कागद, पेंसल्स याची साक्ष देत होता.