वादळी पावसात वीज कोसळून 2 महिलांसह तीन ठार, 2 गंभीर जखमी

भंडारा : शेतात कामासाठी गेलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोन महिलांसह तीन जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मोहाडी तालुक्यातील खमारी बूज येथे मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमींना मोहाडीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आशा संपत दमाहे (४२), अनिता फत्तू सव्वालाखे (४०), अशोक किरतलाल उपराळे (४६, तिघेही, रा. खमारी बूज) अशी मृतांची नावे आहेत. तर रतिलाल किरतलाल उपराळे (५५), त्यांची मुलगी पल्लवी रतिलाल उपराळे (२०) अशी जखमींची नावे आहेत.

गावातील रतिलाल उपराळे यांच्या शेतात मंगळवारी हे सर्व कामासाठी गेले होते. त्यावेळी, दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पावसाला प्रारंभ झाला. पावसापासून बचावासाठी एका झाडाचा आश्रय घेतला. २.३० वाजेच्या सुमारास वीज या झाडावर कोसळली. यात अशोक, आशा आणि अनिता हे तीन जण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी रतिलाल आणि पल्लवी या दोघांना मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी तुमसर तालुक्यातील आष्टी येथे वीज कोसळून मजूर महिला ठार झाली होती. दोन दिवसात वीज कोसळल्याने जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला.