राष्ट्रवादीचे दीपक जयस्वाल, बेबीताई उईके,इंटक चे के.के. सिंग व मनसेचे मनदीप रोडे यांचाही आंदोलनाला पाठिंबा
चंद्रपूर : थकीत पगार व किमान वेतनासाठी तीन दिवसांपासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनाला भेट व पाठींबा द्यायला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार, इंटकचे कामगार नेते के.के. सिंग, मनसेचे मनदिप रोडे आंदोलन स्थळी आले .आंदोलनकर्त्या कामगारांनी पंगतीत बसून जेवण करण्याचा आग्रह केला आणि कामगारांच्या विनंतीला मान देऊन सर्व नेत्यांनी आंदोलनस्थळी पंगतीत बसून कामगारासह भोजन केल्याने एक वेगळेच चित्र आज डेरा आंदोलनात पाहायला मिळाले.
कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याच्या हेतूने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनसुध्दा आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. यावेळी वेकोली राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ (इंटक) चे ज्येष्ठ नेते के.के. सिंग, चंद्रपूर क्षेत्रीय अध्यक्ष चंद्रमा यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल, चंद्रपुर महानगर महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, मनसेचे शहराध्यक्ष मनदिप रोडे, इंटकचे अविनाश लांजेवार चांदा ब्रिगेडचे जंगलु पाचभाई, देवा कुंटा यांनी सुध्दा आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतील कामगारांनी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसापासून मुलाबाळांसह डेरा टाकलेला आहे. कामगारांनी चूल मांडून जेवण व चहाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आंदोलनस्थळी गटागटाने कामगार दोन वेळचे भोजन व चहा तयार करतात .दिवसा मंडपात व रात्री रस्त्यावर कामगारांच्या पंगती बसतात. अशा प्रकारचे पहिलेच आंदोलन चंद्रपुरात होत असल्यामुळे चंद्रपूरकरा मध्येही आंदोलनाला बद्दल कुतूहल निर्माण झालेले आहे.
दरम्यान शासन प्रशासन स्तरावर या आंदोलनामुळे दबाव वाढलेला असून तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे. कामगारांच्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कामगारांचे डेरा आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका जनविकास सेनेचे पप्पू देशमुख व कामगार यांनी घेतली आहे.