चंद्रपूर : कडक संचारबंदी असतानाही चंद्रपूर शहरात विनाकारण कारणं सांगून बाहेर फिरणाऱ्यांची प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही गर्दी काही कमी होत नसल्यामुळे विनाकारण बाहेर फिरणा-यांना धडा शिकवण्यासाठी चंद्रपूर शहर पोलीस व चंद्रपूर मनपाने कंबर कसली आहे. चंद्रपूर शहरात आता विनाकारण फिरताना आढळणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे.
शहरातील कस्तूरबा चौक आणि लक्ष्मीनारायण मंदिर समोर चंद्रपूर शहर पोलिस आणि मनपा प्रशासनाकडून ही मोहीम राबवायला आज सोमवार (10 मे) पासून सुरुवातही करण्यात आली आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी कस्तूरबा चौकात आतापर्यंत झालेल्या 50 चाचण्यात तब्बल 16 पॉझिटिव्ह रुग्ण तर लक्ष्मीनारायण मंदिर समोर नाकाबंदी केली असता 69 लोकांची चाचणी केली. त्यामध्येही 16 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दररोजच्या चौवीस तासात येणा-या संख्येमध्ये चंद्रपूर मनपाचा क्रमांक 6 सर्वात वर लागत. मृत आणी बाधितची संख्या शहरवासीयांना भयभीत करणारी आहे. शहरात रोज जवळपास हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोनाची साखळी तोडून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूनं राज्याच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी लावण्यात आली आहे. काही सेवांना यातून सूट दिलेली असली तरी काही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या अँटिजेन चाचणी करण्यास चंद्रपूर शहरात सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी 32 विनाकारण बाहेर फिरणारे नागरिक बाधित निघाल्याने मनपा प्रशासनही चक्रावून गेले आहे. त्यामुळे ही मोहीम शहरात अधिक तेज गतीने राबविण्याचे संकेत मिळत आहेत.
मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी नागरिकांना विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन केले आहे.
तुम्ही जर चंद्रपूरात असाल तर बाहेर पडण्यापूर्वी खरंच काम महत्त्वाचं आहे का याचा विचार करा नाहीतर आपण बाहेर गेल्यावर चाचणीला सामोरं जावं लालेल, असा इशारा दिला आहे.