मित्राने मित्राला संपविले; दुचाकीच्या वेग ठरले कारण

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

दुर्गापूर येथील घटना, खून करणाऱ्यास अटक

चंद्रपूर : मद्यधंदु अवस्थेत जाणाऱ्या मित्रांचा दुचाकीच्या वेगावरून वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की एकमेकांनी मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाला. ही घटना दुर्गापूर येथे काल गुरुवारी घडली. अक्षय कातकर (वय २६) असे मृताचे नाव आहे. अक्षयच्या खून प्रकरणात सूरज उर्फ संजय यादव याला पोलिसांनी अटक केली आहे.

अक्षय आणि संजय बालमित्र होते. काल त्यांनी येथेच्छ मद्यपान केले. त्यानंतर दुचाकीने घराकडे निघाले. संजय दुचाकी वेगाने चालवत होती. त्याला अक्षयने वेग कमी करण्याचा सल्ला दिला. मात्र संजय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर अक्षयने दुचाकी थांबविण्यास संजयला भाग पाडले. दोघेही दुर्गापूर येथील जनता शाळेजवळ उतरले. तिथे त्यांचा शाब्दिक वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संजयने अक्षयला बेदम मारहाण केले. अर्धमेल्या अवस्थेत त्याला टाकून संजयने पळ काढला.

सायंकाळी पाच वाजताच्या सुमाराला एकाने अक्षय जखमी अवस्थेत पडलेला आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियाला दिली. अक्षयची आई आणि बहिणीने जनता शाळेजवळ धाव घेतली. अक्षयला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या आईने दुर्गापूर पोलिस ठाण्यात संजय यादव विरोधात तक्रार दाखल केली. दुर्गापूर पोलिसांनी संजयला अटक केली.