ऐतिहासिक अपुर्ण देवालय मुर्तीसमुहातील शिवलिंग व नंदीची मुर्तीचा भाग पावसामुळे ढासळला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ इको-प्रो कडुन पाहणी व अधिक हाणी टाळण्यासाठी प्रयत्न
◆ भारतीय पुरातत्व विभागाकडून इको प्रो च्या पत्रव्यवहाराची दखल

चंद्रपूर : शहरातील महत्वाच्या ऐतिहासीक वारसा पैकी एक असलेल्या अपुर्ण देवालय किंवा दशमुखी दुर्गा मुर्तीसमुहापेकी शिवलिंग व नंदीची मुर्तीचा पाया आज पावसाने ढासळला. मागील सप्ताहभरापासुन एक-एक दगड ढासळत असल्याने इको-प्रो त्वरीत पुढील हाणी टाळण्यासाठी प्रयत्न केले.

आज सकाळी लालपेठ मातानगर परिसरातील इको-प्रो चे सक्रीय कार्यकर्ते अब्दुल जावेद यांनी माहीती देताच इको-प्रो पुरातत्व विभागाचे बंडू धोतरे सह बिमल शहा, जयेश बैनलवार, सचिन धोतरे यांनी दशमुखी दुर्गा मुर्तीसमुह मधील नंदी व शिवलिंग असलेल्या मुर्तीची पाहणी केली. मागील हप्ताभरापासुन सततच्या पावसाने मुर्तीच्या पायव्यामधील दगड ढासळल्याने एक बाजुचे दगड पुर्णपणे वेगळे झाले आहे. यामुळे वरील शिवलिंग व नंदी एकाच दगडात मात्र वेगवेगळी असल्याने त्याचा भार सांभाळला गेला नाहीतर या दोन्ही मुर्ती खाली पडुन तुटण्याची दाट शक्यता असल्याने लगेच कमकुवत झालेल्या या भागाला बॅनर्स व ताडपत्री ने त्वरीत झाकुन पुढील हाणी टाळण्याचा प्रयत्न इको-प्रो सदस्यांनी केले.

यासंदर्भात भारतीय पुरातत्व विभागकडुन त्वरीत दुरस्ती करण्याची मागणी आज पत्रव्यवहार करून तसेच संबधीत अधिकारी वर्गाशी बोलुन संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी केली आहे. चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाची दखल घेउन भारतीय पुरातत्व विभागाने इको-प्रो संस्थेशी करार करीत ंिजल्हयातील 21 स्मारके दत्तक दिलेली आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारक जतन करण्यास ;संस्थेकडून जनजागृति चे प्रयत्न सुरु आहेत. यात स्थानिक नागरिकांचा सुद्धा सहभाग मिळावा म्हणून “आपला वारसा, आपणच जापुया” हे अभियान राबविण्यात येत आहे. यासंदर्भात स्थानिक पुरातत्व अधिकारी यांना सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसराचे सौन्दर्यकरण करण्याची गरज असून सदर ऐतिहासिक ठिकाण मधे अनेक पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे आहे.

अपूर्ण देवालय किंवा दशमुखी दुर्गा मूर्तिसमूहचा इतिहास व माहिती

गोंडराजे धुडया रामशहा यांच्या कार्यकाळात सोळाव्या शतकात चंद्रपूर येथे ‘रायप्पा’ नावाचा एक कोमटी जातीचा सधन, संपन्न तसेच धार्मीक प्रवृत्तीचा गृहस्थ होऊन गेला. तो बाबुपेठ परिसरात राहत होता. फार पुर्वी या बाबुपेठ परिसरात असलेले बाभळीचे जंगल कापुन गोंडराजे यांनी वसाहती उभारल्या होत्या. त्यामुळे यास ‘बाबुपेठ’ असे नाव पडले. त्यासोबत लागुनच ‘भिवापुर’ हया पेठा वसविल्या होत्या. खरे तर रायप्पानी करवुन घेतेलेली ही मुर्तीची कामे आश्चर्यकारकच आहे. एकाच दगडात आणी ते सुध्दा रेतीच्या दगडात कोरलेल्या मुर्ती आहेत. प्रत्येक मुर्तीचा आकार भव्य आहे. सर्व मुर्तीचे काम पुर्ण झाल्यावर एक शिवमंदीर बांधुन त्यात शंकराच्या पिंडीची स्थापना करावी व आजुबाजुस इतर मुर्ती ठेवावयाच्या असा त्याचा विचार असावा. पण काम संपत असतांनाच त्याचा मृत्यु झाला. त्याचे मंदीराचे काम अपुर्ण राहीले. त्याच्या मृत्युनंतर या मंदीराच्या कामाकडे कुणीच लक्ष दिले नाही.

या संपुर्ण मुर्ती समुहात एकुण 15 मुर्ती असुन त्यात प्रमुख आणी लक्ष वेधुन घेणारी मुर्ती म्हणजे दशमुखी दुर्गाची मुर्ती ही मुर्ती 23 फुट लांब तर 18 फुट रूंद आहे. यास दहा तोेंडे असल्याने यास बराच काळ ‘रावणाची’ मुर्ती समजत असत. दरवर्षी येथे रावनदहन नंतर लोक यावर दगड फेकीत असत. याचे निरीक्षण केले की लक्षात येईल की रावणाची मुर्ती नसुन दशमुखी दुर्गा आहे. या दशमुखी दुर्गाच्या डाव्या हातात शिरकमल आहे. अंगावर दागीणे कोरण्यात आलेले आहे. अंत्यत भव्य अशी मुर्ती जमीनीवर पसरलेल्या अवस्थेतच आहे. यास दोन ठिकाणी भेंगा पडलेल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या संरक्षण मुळे हया अजुन टिकलेल्या आहेत. सदर मुर्ती भव्य दिसत असली तरी ही या समुहाची प्रमुख मुर्ती नाही. येथील शंकराची पिंड ही मुख्य आहे. कारण, रायप्पास येथे महादेवाचे मंदीर उभारायचे होते. शंकराची पिंड आणी नंदी कोरलेला आहे. नंदीच्या बाजुलाच दगडात कोरलेला एक हत्ती सुध्दा असुन त्याचाच एक भाग आहे.

याच परिसरात दुसरी सर्वात सुंदर, सुस्पष्ट आणी मोठी मुर्ती ही महिषासुरमर्दीनीची असुन यांची लांबी 15 फुट आहे. या मुर्तीच्या डाव्या हातात महीषासुरांचे मुंडके, उजव्या हातात भाला, भाल्याचे टोक महिषासुराच्या कमरेत घुसलेल्या स्थितीत आहे. उजवा पाय रेडयाच्या पाठीवर व डावा पाय डोक्यावर आहे. त्यांनतर मत्सावतार, कच्छावतार यांचे प्रतीक मासा व कासव यांच्या सुस्पष्ट अशा एकाच दगडात कोरलेल्या मुर्ती आहेत. यात अजुन एक सुंदर आकर्षक मुर्ती म्हणजे गणेशाची आहे. ती या सर्व मुर्तीच्या मधोमध आहे. गणेशाच्या हातात परशू असुन डोक्यावर नागाचा पंचमुखी फणा आहे. सोबतच शेषशायी भगवानाची मुर्ती आहे, शेषशायीला एकच फणा असुन हा आजुबाजुला लहान लहान दोन नाग आहेत. या मुर्तीसमुहात शंकराची एक प्रचंड चतुर्भुज मुर्ती असुन तिच्या डाव्या हातात त्रिशुळ, रूंड व उजव्या हातात परश व डमरू आहे. या मुर्तीजवळच कालभैरवाची मुर्ती आहे. या मुर्तीच्या डाव्या हातात नरोटी व उजव्या हातात गदा आहे. एका बाजुस व्दारपाल आहे. डोक्यावर भले मोठे पागोटे व डाव्या हातात दंड आहे.

इको-प्रो च्या मागणीची पुरातत्व विभाग कडून तातडीने दखल

आज दशमुखी दुर्गा मूर्तिसमुह परिसरातील नंदी व शिवलिंग मुर्तीचा ढासळलेला भाग त्वरित दुरस्ती करण्याची मागणीचा भारतीय पुरातत्व विभाग, नागपुर सर्कल चे अधीक्षण पुरातत्वविद श्री रेड्डी यांनी स्थानिक पुरातत्व अधिकारी सहायक प्रशांत शिंदे यांना त्वरित पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज दुपारुन प्रशांत शिंदे व त्यांची चमुने पाहणी करीत नंदी-शिवलिंग मूर्तिसह परिसरातील सर्व मूर्तिची मोजमाप करून मूर्तिचे संवर्धन कार्य करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यास आवश्यक माहिती गोळा केली. यावेळी इको-प्रो चे बंडू धोतरे, अब्दुल जावेद, बिमल शहा, अमोल उत्तलवार उपस्थित होते.