मित्रानेच केली मित्राची हत्या; जुना वाद कारणीभूत, दोघांना अटक

चंद्रपूर : जुन्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना शनिवारी मित्रनगरात उघडकिस आली. संकेत सुमटकर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शुभम साखरकर आणि संगम सागोरे यांना अटक करण्यात आली आहे.

मृत संकेत सुमटकर आणि शुभम साखरकर हे दोघे चांगले मित्र. काही दिवसांपूर्वीच क्षुल्लकशा कारणावरून दोघांत वाद झाला. त्याचा राग शुभमने मनात ठेवला. संकेतचा काटा काढण्याचा निर्णय शुभमने घेतला. यासाठी त्याने संगम सागोरे याची मदत घेतली. ८ सप्टेंबर रोजी शुभमने फोन करून संकेतला एका बारमध्ये बोलविले. दोघांनीही मद्यप्राशन केले. त्यानंतर तेथून दोघेही मित्रनगर परिसराच्या मागे असलेल्या निर्जन भागात आले. या परिसरात शासकीय आौद्योगिक संस्था आहे. याच परिसरात काही मोडक्या स्थितीत असलेले शासकीय निवासस्थान आहे. याच परिसरात आाल्यानंतर संकेतवर शुभमसह संगम चाकूने हल्ला केला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी वार केले. याच संकेतचा जागीच मृत्यू झाला. दोघांनी संकेतचा मृतदेह मोडक्या निवासस्थानी ठेवला.

१० सप्टेंबर रोजी संगम सागोरे यानेच पोलिसांशी संपर्क साधत मित्रनगर परिसरात युवकाचा मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. संगम हा गुन्हेगार आहे. त्याची कल्पना पोलिसांनी होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा त्याने शुभमसोबत आपण संकेतची हत्या केली कबुली दिली. दरम्यान, दोन दिवसांपासून संकेत घरी न आल्याने त्याचा भाऊ सुहास पोलिसांत तक्रार करण्यासाठी निघाला होता. मात्र, वाटेतच त्याला पोलिसांचा फोन आला. त्यांनी संकेतचा मृतदेह मिळाल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी शुभम साखरकर आणि संगम सागोरे याला अटक केली आहे.