वणी (यवतमाळ) : वेकोलीच्या वणी उत्तर क्षेत्रातील कोलरपिंपरी कोळसा खाणीत सुरू असलेल्या रोडसेल मध्ये प्रचंड अनागोंदी माजली आहे. चांगल्या प्रतीचा कोळसा उचलण्याच्या नादात वितरणाचे ‘टार्गेट’ पूर्ण होत नाही. त्याप्रमाणेच एक हजार टन कोळशाच्या अफरातफर प्रकरणी झालेल्या तक्रारीअंती सीबीआय व व्हिजिलन्स चे पथक शुक्रवार दि. 12 मार्च ला कोलरपिंपरीत दाखल झाले.
कोलार पिंपरी कोळसा खाणीत सातत्याने अजब गजब प्रकार उघडकीस येत आहे. काही दिवसांपूर्वी 968 टन कोळसाची अफरातफर झाली होती या प्रकरणी नियमाला बगल देत अल्प दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर रोडसेल करिता कोळसा उचलताना चांगल्या प्रतीचा कोळसा ट्रकद्वारे वाहून नेण्यात येत आहे. डीओ धारकाची मनमानी व अधिकाऱ्यांचे संगनमत याला कारणीभूत असून उच्च प्रतीच्या कोळशाची होत असलेली नियमबाह्य उचल यामुळे वितरणाचे ‘टार्गेट’ पूर्ण होत नाही.
कोलइंडिया व वेकोली ने उत्खनन झालेल्या कोळशाच्या वितरणाबाबत नियमावली तयार केली आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजता पर्यंतच कोळसा खाणीतील काट्यावरून ट्रक भरण्यात येतात मात्र कोलारपिंपरी कोळसा खाणीत नियमाची पायमल्ली करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रक भरण्यात येत आहे यामुळे ज्या डीओ धारकाचा कोळसा शिल्लक आहे त्यांच्या हितार्थ मुख्य महाप्रबंधक व उपप्रबंधक झटत असल्याचे वास्तव उजागर होत आहे.
शुक्रवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) व व्हिजिलन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोलरपिंपरी कोळसा खाणीत धाडसत्र अवलंबले. कोळशाच्या होत असलेल्या अनागोंदी प्रकारा बाबत चौकशी सुरू आहे. वृत्त लिहे पर्यंत कारवाई सुरू होती त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.
सीबीआय व व्हिजिलन्सच्या धडसत्रा बाबत वेकोली उत्तर क्षेत्राचे महा प्रबंधक ईश्वरदास जक्यांनी यांना विचारणा केली असता त्यांनी कारवाईला दुजोरा देत व्यस्त असल्याचे कारण पुढे करीत माहिती देण्याचे टाळले.