घराबाहेर पडू नका, उपलब्ध साहित्यामध्ये गुढीपाडवा साजरा करा : विजय वडेट्टीवार

0
8
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असल्याने गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. सोबतच त्यांनी गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी दारावर तोरण लावले जाते. गुढी उभारून तिला साखरगाठ्यांची माळ घातली जाते. सोनेखरेदी, कपडे खरेदीही केली जाते. मात्र या खरेदीसाठी यंदा घराबाहेर पडू नये, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुढीपाडव्याला खरेदीसाठी बाहेर जाऊ नका, खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली तर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने कोरोनापासून संरक्षणासाठी उचलण्यात येत असलेल्या कठोर उपाययोजनांचा उपयोग होणार नाही, याचीही जाणीव त्यांनी यावेळी करून दिली आहे.

यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी गुढ्या उभारल्या जातील, परंतु शोभायात्रांचे आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की साखरेच्या गाठी स्वतःच घरी तयार करा, घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा मात्र बाजारात गर्दी करू नका. बत्ताश्यांऐवजी घरातच गोड पुऱ्या करून त्यांचा हार गुढीला घालता येईल. पूर्वी घरोघरी श्रीखंड घरातच तयार करत असत. तोच कित्ता पुन्हा गिरवता येईल, अशा आठवणीही त्यांनी जागवल्या. नागरिकांनी यंदा कोरोनाला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असे आवाहनही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केलं  आहे.