चंद्रपूर : आसरा कोव्हिड रुग्णालयात गैरप्रकार झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल. यात दोषी असलेल्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.
बसस्थानक परिसरातील आसरा कोव्हीड रुग्णालयात रात्रीच्या पाळीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ९ जून रोजी गैरप्रकार केल्याचा व्हिडीओ वायरल झाला. ही बाब लक्षात येताच महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी लगेच चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी शनिवार (ता. १२) सायंकाळी ५ वाजता आसरा कोव्हिड रुग्णालयाला भेट दिली.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे उपस्थित होते. मनपा पदाधिकाऱ्यांनी आसरा कोव्हिड रुग्णालयात भेटीदरम्यान उपस्थित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय, शिपाई यांच्याशी चर्चा केली.सीसीटिव्ही फुटेटची पाहणी केली. घटनेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चौकशी समिती नेमून दोषी असलेल्या सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.