चंद्रपूर : जिल्ह्यातून तेलंगणात निष्पाप मुक्या जनावरांची कत्तलीसाठी निर्दयतेने तस्करी करण्याचे राज्यातील मोठे नेटवर्क मागील अनेक महिन्यापासून चांगलेच फोफावले आहे. यावर कायद्याचा लगाम देत जरब बसवून या मोठ्या रॅकेटच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. कारवायांचे धाडसत्र सुरू असल्याने गोवंशीय जनावर तस्कर पुरते गार झाले आहेत. वेगवेगळ्या मार्गाने नव्याने शक्कल लढवून तस्करी करणाऱ्या मात्तबर निर्दयी तस्करांचे अप्पर पोलीस अधिक्षकांच्या धडक अँक्शन मोडने चांगलेच धाबे दणाणले आहे. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात लाठी पोलिसांनी सापळा रचून दोन आयचर (एम एच ३४ बी जी ८३०८ व एम एच ३४ ए बी १२०४), अशोक ले-लँड इकोमेट (टी एस २० टी ६१४०), स्कॉर्पिओ (एम एच ३४ ए डी ६७६९) हि चार वाहने ताब्यात घेत ८६ जनावरांची तस्करांच्या ताब्यातून सुटका करत मोठी कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, सावली येथून हैद्राबाद येथे कत्तलीसाठी आर्वी रस्त्याने सदर वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात होती. याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी उप पोलीस स्टेशन लाठी चे पो.उप.नि.राठोड यांना नाकाबंदी करून वाहनाची झडती घेण्यास सांगितले. या झडतीत लाठी पोलिसांना ६३ बैल व गोरे, १२ गायी, ३ म्हैस व ८ रेडे अशी एकूण ८६ जनावरे ८,४०,०००रुपये किंमतीची, सदरची वाहतुक करणारी वरील तीन ३० लाख रुपयांची वाहने, पायलटिंग करीता वापरलेली रुपये ६ लाखाची स्कॉर्पिओ, स्कॉटिंग करिता वापरलेली टाटा इंडिगो (एम एच ४२ ए एच ०५९२) किंमत ४ लाख, १ लाख ४ हजार रुपयांचे १० मोबाईल असा एकूण ४९ लाख ४४ हजार रुपयांचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
आरोपी तेलंगणा गोयगाव येथील जाकीर अहमद शेख (२४), इरशाद गफार शेख (१९), शेख हमीद शेख मकदुम (२५), गडचांदूर येथील सोहेल अहमद शेख (१९), हफिज खान गुफरान खान (२७), रेहान कय्युम केरेशी (२८), बल्लारपूर येथील सनाउल्ला खान एहेसान खान पठाण (२९), अलीम युसूफ खान (२९), लक्कडकोट येथील सत्यनारायण भीमय्या सोतकुल (२५), कविटपेठ येथील राजू बाबुराव नक्कावार (३२), मारोती गणपत बेडलावार (३१) यांना अटक करण्यात आली असून गोवंशीय जनावरांचे मालक फरार आरोपी इमरान कुरेशी,शहेबाज कुरेशी राहणार गडचांदूर असे एकूण १३ आरोपी विरुद्ध लाठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीवर कलम ५ (ब), ९, ११ महाराष्ट्राचा प्राणी अधिनियम १९७६ सुधारित २०१५ सह कलम ११ (१) (ड) भारताचा प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गोवंशीय जनावरांना सुरक्षितपणे उज्ज्वल गोरक्षण संस्था लोहारा, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस स्टेशन लाठीचे ठाणेदार राठोड सह येथील स्टाफ नापोशी गंगाधर, पोशी राहुल, वृषभ, संजू, शंकर, स्वप्नील, विशाल तसेच नक्षल विरोधी अभियान पथक (C-60) चंद्रपूर या पथकातील पोलीस अंमलदार यांच्या मदतीने पार पडली.