चंद्रपूर महानगरातील पाणी टंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना कराव्‍या :

0
11
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• माजी अर्थमंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचना

चंद्रपूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या इरई धरणातील पाण्‍याची पातळी कमी होत चालली असुन यासंदर्भात त्‍वरीत योग्‍य नियोजन केले नाही तर मे महिन्‍यात शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल, ही बाब लक्षात घेता त्‍वरीत प्रभावी उपाययोजना करण्‍याच्‍या सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

या विषयासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दि. 16 एप्रील रोजी झुमद्वारे बैठक घेतली व चर्चा केली. बैठकीला जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने, मनपा आयुक्‍त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, मजीप्राचे अधिकारी आदींची ऑनलाईन उपस्‍थीती होती.

इरई नदीवर बंधारा बांधण्‍यासाठी व त्‍यामाध्‍यमातुन पाण्‍याच्‍या साठवणूक करण्‍यासाठी महानगरपालिकेने त्‍वरीत अंदाजपत्रक जिल्‍हाधिकारी यांचेकडे सादर करण्‍याच्‍या सुचना आ. मुगंटीवार यांनी आयुक्‍तांना दिल्‍या. महानगरातील पाणी टंचाईचा आराखडा शासनाला सादर करून उपाययोजनांसाठी निधीची मागणी करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी जिल्‍हाधिका-यांना दिल्‍या. विहिरी व बोअरींगच्‍या पाण्‍याची तपासणी करून पाणी पिण्‍यास योग्‍य आहे किंवा नाही याबाबतचे फलक जलस्‍त्रोतांशेजारी लावण्‍याच्‍या सुचना सुध्‍दा त्‍यांनी यावेळी दिल्‍या. सार्वजनिक ठिकाणच्‍या बोअरिंग्‍ज जवळ रेन वॉटर हार्वेस्‍टींगची व्‍यवस्‍था करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी यावेळी दिले. ए‍प्रील म‍हिन्‍याच्‍या मध्‍यात आपण आलो असुन उन्‍हाळी झळा तापायला लागल्‍या असताना पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होवू नये म्‍हणून याविषयासंदर्भात प्रभावी उपाययोजना करण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

आ. मुनगंटीवार यांच्‍या सुचनांच्‍या अनुषंगाने या विषयाबाबत सर्व आवश्‍यक बाबी तपासुन कार्यवाही करण्‍यात येईल तसेच महानगरातील पाणी टंचाईचा आराखडा शासनाकडे पाठवून त्‍यासाठी निधीची मागणी करण्‍यात येईल असे जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांनी यावेळी सांगीतले.