45 लाखांच्या दरोड्यातील मुख्य आरोपी जेरबंद ; जोधपूर जिल्ह्यातील लोहावत गावातून झाली अटक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ : वणी तालुक्यातील निळापूर मार्गावर भरदिवसा लुटलेल्या 45 लाखांच्या दरोड्यातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला राजस्थान येथून अटक केली आहे. घटनेच्या तब्बल 25 दिवसानंतर वणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने दरोड्यातील मुख्य सूत्रधार बाबूलाल बिश्नोई यास जोधपूर जिल्ह्यातील लोहावत गावातून अटक केली आहे.

घटनेतील इतर तीन आरोपी अजूनही फरार आहे. मात्र घटनेतील मास्टर माईंड हा पोलिसांच्या हाती लागल्यामुळे घटनेचा लवकरच 45 लाखांच्या दरोडा प्रकरणाचा उलगडा होईल अशी शक्यता आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी तालुक्यातील निळापूर मार्गावरील इंदिरा एगजीम प्रा.लि. जिनिंग फॅक्टरीचा मॅनेजर मनीष जंगले हा 20 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता बँक ऑफ इंडियातून 45 लाखांची रोकड बॅगमध्ये घेऊन दुचाकीने जिनिंगमध्ये जात होता. दरम्यान जिनिंग अहफाज जिनिंग समोर मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने मनीषच्या दुचाकीला धडक दिली. धडक लागल्यामुळे मनीष हा दुचाकीसह खाली पडला. तेव्हा कारमधून एका व्यक्तींनी खाली उतरून मनीषचे तोंड दाबले तर दुसऱ्यांनी पैशांनी भरलेली पिशवी हिसकून दोघे कारमध्ये बसून पळून गेले. दिवसाढवळ्या 45 लाखांचा दरोड्याची घटनेमुळे पोलिसांसमोर आरोपींना शोधण्याचे आव्हान उभे ठाकले होते.

संशयित आरोपींच्या शोधात डीबी पथकाचे पोउनि गोपाल जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने राजस्थान गाठले. मात्र 12 दिवस शोधमोहीम राबवूनही पथकाला रिकाम्या हातांनी परतावे लागले. काही दिवसानंतर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सपोनि गजानन करवाडे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक पथक राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यात पाठवण्यात आले.
अखेर 13 एप्रिल रोजी पथकाने मुख्य आरोपी बाबूलाल बिश्नोई (36) याला लोहावत गावातून अटक केली. आरोपी बाबूलाल मागील 15 वर्षापासून वणी परिसरात वास्तव्यास असून परिसरातील जिनिंग कारखान्यांमध्ये कामगार पुरवठा करण्याचे कार्य करीत होता. दरोड्याच्या घटनेतील मुख्य आरोपीस अटक झाल्यामुळे इतर आरोपींनाही लवकरच बेड्या ठोकणार असा दावा पोलिसांनी केला आहे.

आरोपीला अटक करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे सपोनि गजानन कडेवार, डीबी पथक प्रमुख पोउनि गोपाल जाधव, गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे यांनी कारवाई पार पाडली.