मुंबई : दादर येथील शिवसेना भवनाबाहेर आज भाजप युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आलं. राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून शिवसेनेने टीका केली होती. याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते येथे जमले होते. याबाबतची माहिती मिळताच शिवसैनिकांनी येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.
यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली व ते एकमेकांना भिडले. प्राप्त माहितीनुसार शिवसेना व भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
पोलिसांनी यावेळी भाजप युवा मोर्चाच्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.
शिवसेनेची भूमिका
अयोध्येत जमीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार असल्याचे आरोप व त्याबाबतची कागदपत्रे समोर आली आहेत. अशाप्रकारचा घोटाळा हिंदूंसाठी संतापजनक असून या प्रकरणाबाबत संस्थेबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदनेही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेऊन राम मंदिर ट्रस्टवर जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सिंह यांनी केली.
‘गेले १०० वर्ष आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,’ अशी भूमिका मांडत ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आरोप फेटाळले आहेत.