कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी बालकांची काळजी घ्यावी : बालरोगतज्ज्ञांचा पालकांना सल्ला

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामध्ये लहान बालकांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लहान मुलांची प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक असून, लाॅकडाऊनमध्ये, तसेच लाॅकडाऊन संपल्यानंतरही त्यांना घराबाहेर पडू न देता त्यांची काळजी घ्यावी, एवढेच नाही तर आजाराची काही लक्षणे आढळल्यास डाॅक्टरांकडे न्यावे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये मृत्युदररी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेविषयी सर्वत्र बोलले जात असल्यामुळे लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही संभाव्य धोका लक्षात घेता तयारी सुरू केली आहे. घरांमध्ये ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास बालकांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांच्या संपर्कात बालक येणार नाही, याची काळजी घ्यावी. बालकांना ताप, सर्दीसह खोकला असे लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, लाॅकडाऊन आहे म्हणूनच नाही तर लाॅकडाऊन संपल्यानंतरही बालकांना बाहेर नेणे टाळावे. न्यायचेच झाल्यास गर्दी नसलेल्या ठिकाणी, तसेच मास्क लावूनच बाहेर न्यावे, तसेच सकस आहार, तसेच त्यांच्याकडे घरच्या घरी थोडाफार व्यायामही करून घ्यावा, जमल्यास बालकांना मास्क लावण्यासंदर्भात सांगावे, सोशल डिस्टन्स तसेच कोरोना संसर्गासंदर्भात त्यांना माहिती करून द्यावी, असा सल्लाही बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

पालकांनी घ्यावी ही काळजी                          घरात वयस्क कोणी बाधित असेल तर त्यांचा बालकांशी येणारा संपर्क टाळावा. थंड पदार्थ खाण्यासाठी देऊ नयेत. सकस आहार तसेच गरम आणि ताजे अन्न द्यावे. लहान मुलांना थंड पाण्याने आंघोळ घालू नये.

लहान मुलांना मास्क घालण्याची सवय लावावी, हात, पाय, स्वच्छ धुवावे, शारिरीक अंतराचे पालन करण्याचे महत्त्व त्यांना सांगावे. फिराला नेताना पालकांनी मुलांसोबत जावे.

जिल्हा प्रशासनाने सुरु केली तयारी
तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये लहान मुलांना अधिक धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तशी तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून संभाव्य धोका लक्षात घेता बालकांसाठी ऑक्सिजनयुक्त बेड तयार ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.