चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर गुन्हेगारींमध्ये प्रचंड वाढ

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ माजी वित्तमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सनसनाटी आरोप
◆ अभ्यास समिती गठीत करण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी मागे नेमकी कोणती कारण आहेत. जिल्ह्यात दारूबंदी उठविल्यानंतर खून, बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली का? याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीचे गठन करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यांच्या या मागणीने आता ‘दारू’ या विषयावरून चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात धुराळा उडण्याची शक्यता आहे.

एकतर्फी प्रेमातून दोन दिवसांपूर्वी चाकू हल्यात एका अल्पयवीन मुलीचा चंद्रपुरात मृत्यू झाला. चाकू हल्ला करताना आरोपीने यथेच्छ मद्यपान केले होते. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात खून, चोरी, भांडण-तंट्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्हेगारी घटनांना दारू सुरू झाल्याची पार्श्वभूमी आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आता खुद्द आमदार मुनगंटीवार यांनीही वाढत्या गुन्हेगारीमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी संपूर्ण दारूबंदीसाठी आंदोलन केले. तत्कालीन कॉंग्रेस सरकारने यासाठी समिती बसविली होती. परंतु त्यांनी दारूबंदीची निर्णय घेतला नाही.

त्यानंतर राज्यात युतीचे सरकार आले. मुनगंटीवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद आले. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षांच्या काळात दारूबंदीच्या फायदे आणि तोट्यांत नेहमीच सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायच्या. दारूबंदीच्या काळात जिल्ह्यातील अवैध दारूचा पुरवठा. त्यातून निर्माण झालेली गुन्हेगारी. त्यामुळे दारूबंदीची मागणीसुद्धा अधेमध्ये व्हायची. हाच मुद्दा घेऊन कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी दारूबंदी उठविण्याचे आश्वासन लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दिले होते. राज्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार आले आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा मार्ग मोकळा झाला.

२७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला. पाच जुलै २०२१ रोजी प्रत्यक्षात दारूविक्रीला सुरुवात झाली. या दारूबंदी हटविण्याच्या निर्णयावर तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. आता चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी मागे दारू असल्याची चर्चा आहे. जिल्ह्याला हादरून टाकणाऱ्या गुन्हेगारी विश्वातील घटनासुद्धा या काळात घडल्या. त्यामुळे आता मुनगंटीवार यांनी वाढत्या गुन्हेगारी मागील कारणांचा शोध घेण्यासाठी अभ्यास समितीचे गठन करण्याची मागणी केली आहे.

अभ्यास समिती गठीत करा : सुधीर मुनगंटीवार माजी अर्थमंत्री, विद्यमान आमदार

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यानंतर खून, बलात्कार वाढले का? याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक विभागांत माफिया राज सुरू झाले आहे वाळू, दारू, कोळसा माफिया तयार झाले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आपल्या विभागाला सक्रिय केले पाहिजे. या सहभागी गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली पाहिजे.