चंद्रपूर : कोळसा प्लॉटवर अनधिकृत कोळसा उतरवीत असताना वणी येथील लालपुलिया परिसरात 3 खासगी कोळसा व्यावसायिकांच्या कोल डेपोवर गुरुवारी सायंकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी तीन ट्रक जप्त केले. या कार्यवाहीत 3 ट्रक चालक कोळसा खरेदी करणारे 3 व्यापारी आणि कोळसा विक्री करणाऱ्या नागपूर येथील एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली. दरम्यान प्रकरण थांबविण्यासाठी पंधरा लाख रुपये देऊ पाहणाऱ्या नागपूर येथील कोळसा व्यवसायिकांला ठाणेदार वैभव जाधव यांनी चांगलाच इंगा दाखविल्याची चर्चा आहे.
नागपूर येथील एका बंद कंपनीच्या नावावर डब्ल्यूसीएलच्या निलजई कोळसा खाणीतून कमी दरात शेकडो टन कोळसा उचलून वणी येथील व्यापाऱ्यांना विकत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली. त्या अनुषंगाने वणी पोलीस व डीबी पथकाने गुरुवारी दुपारी बबलू दिवाण, इमरान शेख व सुनील काळे यांच्या कोळसा प्लाटवर धाड टाकली. त्यावेळी ट्रक मधून कोळसा उतरविण्याचे काम सुरु होते. पोलीस अधिकाऱ्यांनी कोळसा डिलिव्हरी ऑर्डर (DO) बघितले असता त्याच्यावर निलजई ते बुटीबोरी येथील फ्रीडम नावाच्या कंपनीत कोळसा जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. कंपनीला कमी दरात कोळसा मिळतो. याचाच फायदा घेत कोळसा तस्कर एखाद्या बंद कंपनीच्या नावे डीओ तयार करतात. हा कोळसा त्याच कंपनीला विकावा लागतो. या प्रकरणात दुस-या कंपनीच्या नावे घेतलेला कमी दराचा कोळसा खासगी व्यापाऱ्यांना अनधिकृतरित्या विकला जात असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी कोळसा भरलेले तिन्ही ट्रक जप्त करून चालकांना ताब्यात घेतले. तसेच कोळसा प्लाट मालक बबलू दिवाण, इमरान शेख व सुनील काळे यांनाही ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोळसा व्यावसायिक आणि ट्रक चालकांना शुक्रवारी कोर्टात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल. कालही अशीच एक कारवाई करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र या कोळशात ‘पाणी’ मुरल्याने ही चर्चाच ठरली. कोळसा डेपोवर पोलीस कारवाईची महिती मिळताच वणी पोलीस स्टेशन परिसरात अनेक आलिशान एसयूव्ही गाड्या चकरा मारताना दिसून आल्या. कोळशाची परस्पर अफरातफर करणारा नागपूर येथील व्यापारी अटल गिरी हा सरळ ठाणेदाराच्या केबिनमध्ये जाऊन ऐटीत ‘साहेब.. अपनी गाडियां है, क्या लेना है ले लो.’ म्हणत ठाणेदार वैभव जाधव यांना 15 लाख रुपयांची ऑफर दिली. व्यापाऱ्याच्या मग्रुर व्यवहारामुळे ठाणेदार वैभव जाधव यांचा पारा भडकला आणि त्यांनी खास बाजीराव पट्टा हातात घेऊन त्या व्यापाऱ्याला इंगा दाखविल्याची माहिती आहे.