• ऑक्सिजन पुरविण्यासाठी दोन वितरकांची नियुक्ती
• आवश्यकतेनुसार कंत्राटी डॉक्टरांच्या सेवा घेण्याचे निर्देश
चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. कोविड रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी दोन वितरक नेमण्यात आलेले आहेत. या वितरकाकडून ऑक्सिजन पुरवठा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करण्याबरोबरच इतर ठिकाणाहून सुद्धा ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, आई.सी.यु आणि व्हेंटिलेटर बेडची अधिक गरज असते. रुग्णांना योग्य त्या आरोग्य सुविधा आणि सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासनामार्फत जिल्ह्यात पाच शासकीय तर उर्वरित खाजगी रुग्णालये असे एकूण 29 ऑक्सिजन सुविधा युक्त रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात डेडिकेटेड कोविड रुग्णालय व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर यात 93 आयसीयु व्हेंटिलेटर बेड, 224 आयसीयु ऑक्सिजन बेड, तर 750 ऑक्सिजन बेड असे एकूण 1 हजार 67 बेड उपलब्ध आहेत.
नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी. तसेच लवकर उपचार घ्यावेत. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांची कोरोना विषयक आढावा बैठक
शासकीय रुग्णालयात आवश्यकतेनुसार कंत्राटी डॉक्टरांच्या सेवा घेण्याचे निर्देश
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना शासकीय रुग्णालयात तत्परतेने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जेथे डॉक्टरांची संख्या कमी पडत असतील तेथे कंत्राटी तत्वावर डॉक्टर व इतर आरोग्य सेवकांच्या सेवा वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जाणून घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात ही बैठक पार पडली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन) जनार्दन लोंढे, , वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. श्रीकांत परांजपे, डॉ.श्रीकांत मसराम, डॉ. दीप्ती श्रीरामे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोविड रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सेवा, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता याची माहिती जाणून घेतली. रुग्णालयात रुग्णांना आवश्यक सेवा पुरवाव्यात, वार्डात स्वच्छता राखावी, वार्ड निहाय सेवा देणाऱ्या डॉक्टरांची नावे व संपर्क क्रमांक यांचे योग्य ते फलक लावावेत, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना अडचण जाणार नाही व योग्य ती माहिती मिळेल, अशा सूचना यावेळी दिल्या. त्यासोबतच रुग्णालयात बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदविण्याचे ही निर्देश दिले.