यवतमाळ : कोरोना विषाणू हा आता कुणालाच सोडताना दिसत नाही. आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडली असून उपचाराअभावी रुग्ण रस्त्यावर अखेरच्या घटका मोजत आहे. महामारी किती भयावह असू शकते याचा प्रत्यय रविवारी दुपारी दत्त चौकातील एका औषधी दुकानासमोर आला. प्रकृती तपासण्यासाठी खासगी डॉक्टरकडे आलेला रुग्ण औषधी घेण्यासाठी दुकानासमोर उभा होता. अस्वस्थ वाटल्याने खाली बसले. तिथेच त्यांनी प्राण त्यागला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले.
अकोलाबाजार परिसरातील हातगावचे मारोतराव शेळके (५९) हे त्यांच्या गावातील आनंद व्यवहारे या युवकासोबत आरोग्य तपासणीसाठी आले होते. डॉ. अरुण जनबंधू यांच्याकडे त्यांनी प्रकृतीची तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी एचआरसीटी स्कोअर १४ चा असल्याने तत्काळ उपचारार्थ कुठे तरी दाखल व्हा असा सल्ला दिला. सोबतच काही औषधी लिहून दिली. ही औषधी घेऊन काही तरी निर्णय घेऊ या विचारात मारोतराव शेळके होते. त्यांनी लगतच्या नरेश मेडिलक स्टोअरमध्ये औषधी कितीची होते, अशी विचारणा केली. चार हजार ५०० रुपयांची औषधी होईल असे सांगण्यात आले. तितके पैसे सोबत नसल्याने मारोतराव शेळके यांनी अर्धीच औषधी द्यावी, अशी मागणी केली. स्टोअरचा चालक औषध काढत असतानाच मारोतराव पायरीवर बसले. त्याच पायरीवर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोबत असलेल्या आनंदलाही क्षणात काय झाले हे कळलेच नाही. कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव त्यांनी केलेल्या सीटी स्कॅनवरून दिसत होतो. कोरोनाची दुसरी कोणती चाचणी त्यांनी केली नाही. नेमका त्यांचा मृत्यू अचानक झाला कशाने हे वैद्यकीय दृष्ट्या अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र कोरोनानेच त्यांचा बळी घेतला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. महामारीत माणसे पटापट मरतात याचा अनुभव रविवारी या परिसरातील उपस्थितांनी घेतला. घटनास्थळी अवधूतवाडी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर शासकीय सोपस्कार सुरु होते.
मारोतराव शेळके यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना काही तपासण्या करायला लावल्या. त्यात निमोनिया आढळून आला. त्यांचा स्कोअर १४ होता. शरीरातील ऑक्सिजनही कमी झाले होते. सर्व लक्षणे कोरोनाचीच होती. फक्त चाचणी केली नसल्यामुळे ते निश्चित झाले नाही. त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला होता. दुदैवाने रस्त्यातच त्यांचा घात झाला: डॉ. अरुण जनबंधू