150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटोरोझोईक काळातील दुर्मिळ जीवाश्‍म सापडले

◆ चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी शोधले दुर्मिळ जीवाश्‍म

चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात अति प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध काळातील चूनखडक आढळतात. याच चुनखडकात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटोरोझोईक काळातील अतिशय दुर्मिळ जीवाश्‍म सापडले आहेत. समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबेक्‍टेरीया (स्ट्रोमाटोंलाईट) या सूक्ष्म जीवांचे हे जीवाश्‍म चुनखडकात सापडले आहेत.
चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ही दुर्मिळ जीवाश्‍म शोधून काढली आहेत. पृथ्वीची उत्पत्त्ती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झाली. पण सजीवांची उत्पत्ति मात्र 3 ते 4 अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्‍म सापडले आहेत, त्यांना स्ट्रोमाटोंलाईट असे म्हणतात.

या सूक्ष्मजीवांना सायनो बेक्‍टेरीया असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटेरोझोईक काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्‍मे आढळतात.
तेव्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झाले. ती पृथ्वीवरील प्रथम विकसित झालेली जीव होती. ही सर्व आदीजीव खनिजे खाऊन जगत होती. पुढे अशाच जीवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला.

प्रा. सुरेश चोपणे हे मूळचे वणीचे असून ते या परिसरात नियमित ऐतिहासिक आणि भौगोलिक संशोधन करीत असतात. दोन वर्षापूर्वी त्यांनी चंद्रपूर जवळ स्ट्रोमाटोंलाइटची जीवाश्‍मे शोधून काढली होती. 15 वर्षापूर्वी वणी परिसरातील बोर्डा येथे झालेल्या भूकंपाचा त्यांनी अभ्यास केला होता. यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी 5 ठिकाणी पाषाणयुगिन स्थळे, तर 4 ठिकाणी कोट्यावधी वर्षापूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्‍मे शोधून काढली आहेत.

चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा
चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्‍मे आढळली. या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स आणि ओर्कोटोंरीअल्स असे म्हणतात. ही जीवाश्‍मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समुहाने राहत होती. पुढील क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला. त्यामुळे चिखलांचे रुपांतर चुनखडकात झाले आणि जीवांचे रुपांतर जीवाश्‍मात झाले. आजही करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पष्ट दिसतात. ही जीवाश्‍मे यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळ मोहोरली-बोर्डा परिसरात आढळली आहे, असे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.