तब्बल २० तासांनंतर कोरोनाबाधित रुग्णाचा विहिरीतून काढला मृतदेह

वर्धा : आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णाने पलायन करून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्या रुग्णाचा मृतदेह शहरालगतच्या विहिरीत आढळला. क्रेनच्या साहाय्याने तब्बल २० तासांनंतर त्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. आष्टी तालुक्यातील रहिवासी असलेला हा रुग्ण रविवारी रात्री रुग्णालयातून पसार झाला. पहाटेपर्यंत परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पोलिसांनी शोध घेतला असता शहरापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावरील शेतात पाहणी करताना त्याचा विहिरीत मृतदेह आढळून आला. काल सोमवारी २० तासांनंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.