यवतमाळ : जिल्ह्यातील मांगुर्ला जंगलातील गुहेत असलेल्या गर्भवती वाघिणीच्या शिकार प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्धार पोलीस व वनविभागाने केला आहे. निर्दयीपणे वाघिणीचे पंजे छाटणाऱ्या पाच आरोपींना अखेर आज १९ जून रोजी वन व पोलिसांच्या संयुक्त पथकाने गजाआड केले आहे. नागोराव भास्कर टेकाम, सोनू भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनू तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम असे गजाआड.
केलेल्या पाच आरोपींची नावे आहे. उपरोक्त सर्व आरोपी वरपोड येथील रहिवासी आहे . यापूर्वी वाघिणीच्या हत्येप्रकरणी दुभाटी येथून दोन आरोपींना अटक केली होती. मुकुटबन वनपरिक्षेत्रातील मांगुर्लाजवळ वन क्र . ३० मध्ये २५ एप्रिल रोजी वाघिणीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे जिल्हाच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली होती.
हत्या करणाऱ्यांनी नाल्याजवळील गुहेत असलेल्या वाघिणीची शिकार करण्यासाठी गुहेपुढे आग पेटविली होती. चहूबाजूने घेरून तिचे दोन्ही पंजे तोडून नेले होते . विशेष म्हणजे ही वाघिण दोन महिन्याची गर्भवती होती. वाघिणीच्या गळ्यात फास टाकून तिच्या शरीरावर धारदार हत्यारांनी वार केल्याचे आढळले होते. त्यामुळे आरोपींना पकडण्यासाठी मध्यंतरी पोलीस व वनविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा दुभाटीत धडकला होता. त्यामध्ये यवतमाळ, मुकुटबन, शिरपूर , पाटण, वणी येथील पोलीसदलातील अधिकारी, वनविभागाचे कर्मचारी, पांढरकवड्याचे एसडीपीओ संजय पुज्जलवार कारवाईत सामील होते. पांढरवाणीत फौजफाटा दाखल झाला होता . नेमकी हिच पद्धत यावेळी वापरण्यात आली.
शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वरपोड या गावी पोलीस व वनविभागाचे पथक धडकले. कोम्बिंग ऑपरेशन राबवून पथकाने आरोपींना अटक केली. मुकुटबन पोलिसांना विशेष कामगिरीबद्दल बक्षीसही देण्यात आले आहे.