‘गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शाहांवर आरोप केले होते, तेव्हा भाजपने राजीनामा घेतला होता का?’

0
482
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आरोप केले तर त्याची शहानिशा न करताच ते खरे कसे मानायचे, असा सवाल सावंत यांनी विचारला.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांनी  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता काँग्रेस पक्ष महाविकासआघाडी सरकारच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे. 2002 साली अमित शाह गुजरातच्या गृहराज्यमंत्रीपदी होते तेव्हा तत्कालीन पोलीस प्रमुख डी.जी. वंजारा यांनी अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हा भाजपने अमित शाह यांचा राजीनामा घेतला होता का, असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकापरिषदेत बोलत होते. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आरोप केले तर त्याची शहानिशा न करताच ते खरे कसे मानायचे, असा सवाल सावंत यांनी विचारला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच्या प्रकरणांचा दाखला दिला. 2002 साली गुजरातचे तत्कालीन पोलीस प्रमुख डी.जी. वंजारा यांनी अमित शाह हे पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

मात्र, त्यावेळी भाजपने अमित शाह यांचा राजीनामा घेतला नाही. भाजपकडे नैतिकतेची दोन मापं आहेत, एक स्वत:साठी आणि एक दुसऱ्यांसाठी. त्यानंतर पोलीस अधिकारी संजीव भट यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. तसेच गुजरात सरकारने दहशतवाहीविरोधी पथक एका मुलीच्या मागे लावल्याची घटनाही समोर आली होती. या सगळ्याची चौकशी झाली का, याचे उत्तर भाजपने द्यावे, असे सचिन सावंत यांनी म्हटले.

‘परमबीर सिंहांची पार्श्वभूमी वादग्रस्त, मग तेव्हाच का बोलले नाहीत?’

परमबीर सिंह यांची स्वत:ची कारकीर्द वादग्रस्त आहे. त्यांच्या जवळचा माणूस असणाऱ्या सचिन वाझे यांच्यावर राष्ट्रीय तपासयंत्रणेने कारवाई केली आहे. या पत्रात परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांनी डान्सबारमधून पैसे गोळा करायला सांगितल्याचा आरोप केला आहे. हे सर्व फेब्रुवारी महिन्यात घडले. मग परमबीर सिंह यांनी तेव्हाच पुढे येऊन चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज का उठवला नाही, असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला.

‘भाजपच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून माहिती पुरवली जाते’

या संपूर्ण प्रकरणात भाजपच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून आधीच माहिती पुरवली जाते. कालही परमबीर सिंह यांचे पत्र समोर आल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन मिनिटांत प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यानंतर भाजपचे प्रवक्तेही पटापट प्रतिक्रिया देताना दिसले. या सर्व गोष्टी स्क्रिप्टेड असल्याच आरोप सचिन सावंत यांनी केला.