◆ वडगाव प्रभागातील अथर्व कॉलनीला नगीनाबाग प्रभागांमध्ये दाखवून निधी मंजूर केला
◆ राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांचा आरोप
चंद्रपूर : नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत अनुसूचित जातींच्या वसाहतीमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी विशेष अनुदान प्राप्त होते. चंद्रपूर महानगरपालिकेला 2019 मध्ये प्राप्त झालेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीमध्ये सुमारे 40 लक्ष रुपयांची अफरातफर केली असा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी पुराव्यानिशी केलेला आहे. यासंदर्भात त्यांनी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, चंद्रपूरचे पोलीस अध्यक्ष तसेच शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे.मनपा आयुक्त यांनी आपल्या स्तरावर कारवाई न केल्यास न्यायालयामध्ये फौजदारी व दिवाणी कारवाईसाठी न्याय मागण्याचा इशारा सुद्धा दीपक जयस्वाल यांनी दिलेला आहे.
काय आहे प्रकरण ?
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी खर्च करण्यासाठी प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेतून निवडून आलेला किमान एक नगरसेवक असणे आवश्यक असते. दिनांक 7 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये वडगाव प्रभागांमधील अथर्व कॉलनी परिसरात सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता,नाली व पेव्हींग ब्लॉक लावण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली.या कामाची अंदाजपत्रकीय किमंत रुपये 39 लक्ष 26 हजार 440 रुपये होती. कामाला मंजुरी दिल्यानंतर मे.भाग्यलक्ष्मी कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराला कार्यादेश देऊन काम सुध्दा करवून घेण्यात आले.कंत्राटदारांची देयके सुद्धा मंजूर करण्यात आली.
वडगाव प्रभागांमध्ये दलित वस्तीचा निधी खर्च करण्यात आला.परंतु या प्रभागात एकही नगरसेवक अनुसूचित जाती मधून निवडून आलेला नाही. त्यामुळे नियमानुसार या प्रभागांमध्ये दलित वस्ती सुधार योजनेचा निधी खर्च करता येत नाही.यावर उपाय म्हणून स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष राहुल पावडे यांनी अथर्व कॉलनी या परिसराला नगीनबाग प्रभागांमध्ये दाखवून या कामाचा ठराव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेतला. पूर्ण जाणीव आणि माहिती असताना हेतुपुरस्सर वडगाव प्रभागातील एखादा परिसर नगीनबाग प्रभागात दाखवून निधीची अफरातफर केल्यामुळे तत्कालीन स्थायी अध्यक्ष राहुल पावडे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी नगरसेवक दिपक जयस्वाल यांची मागणी आहे.
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एखाद्या कामाला मंजुरी देण्यापुर्वी नियमानुसार महानगरपालिकेचे नगर रचनाकार व शासनाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कामाच्या जागेचे मौका निरीक्षण करणे आवश्यक असते.मात्र या प्रकरणात सर्व संबंधित अधिकारी व अभियंता यांनी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असा नगरसेवक जयस्वाल यांचा आरोप आहे.स्थायी समिती अध्यक्ष राहुल पावडे,मनपाचे नगर रचनाकार, शासनाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी व मनपातील दोषी अभियंता यांचे विरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक जयस्वाल यांनी आयुक्त राजेश मोहिते यांना दिलेल्या तक्रारी द्वारे केली आहे. नगरसेवक जयस्वाल यांनी आयुक्त मोहिते यांना वडगाव प्रभाग व नगीनाबाग प्रभागाच्या प्रारूप रचनेची तसेच स्थायी समितीच्या ठरावाची प्रत जोडून तक्रार केलेली आहे.