◆ जैतापूर येथील घटना; शेतीचा हंगाम करायचा कसा?
चंद्रपूर : आज सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील जैतापूर गावाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या विठ्ठल ताजणे यांच्या गोठ्याला अचानक आग लागून यात एक बैल, जनावरांचा चारा, शेतीउपयोगी लाकडी साहित्य, रासायनिक खत यासह लाखो रुपये किंमतीची नुकसान झाले असून ऐन शेतीच्या हंगामाच्या वेळेस नुकसान झाल्याने शेतीचा हंगाम करायचा कसा असा प्रश्न विठ्ठल ताजणे यांना पडला असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार मध्यरात्रीच्या वेळेला सर्व गाव शांत झोपलेला असताना अचानक गावाच्या वेशीवर असलेल्या गोठ्याने पेट घेतला यावेळी नेहमीप्रमाणे दोन बैल, बियाणांची पेरणी करण्यासाठी करण्यासाठी आणलेल्या दहा बॅग डीएपी रासायनिक खत, वर्षभराचा जनावरांचा चारा, शेतीउपयोगी लाकडी नांगर, वखर, डवरा, दोरखंड यासह अन्य वस्तू गोठ्यात ठेवून होत्या मात्र हे सर्व क्षणात जळून खाक झाले. पहाटेच्या सुमारास लघुशंकेला निघालेल्या नागरिकांना निवारे चमकत दिसले असता अजूबाजुच्या लोकांना माहिती देऊन घटनास्थळी पाहले असता चाळीस हजार रुपये किंमतीचा एक बैल होरपळून जागीच मरण पावला तर एक बैल दोरखंड तोडून बाहेर निघालेला होता. इतर सर्व साहित्याची राख झाल्याचे दिसून आले.
आधीच नपिकीने त्रस्त असलेल्या विठ्ठलने शेतीचा हंगाम करण्यासाठी उसनवार पैशांची जुळवाजुळव करून खत बी-बियाणांची सोय केली. ज्याच्या भरोशावर संपूर्ण कुटुंबाचे पोट भरत होते त्या बैलजोडीतील एक बैल मरण पावल्याने पेरणीचा हंगाम करायचा कसा, ऐन वेळेवर सर्व साहित्याची जुळवाजुळव कशी करायची, आता पेरले नाही तर वर्षभर खायचे काय असा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत करून शेती हंगामासाठी बैलाची व्यवस्था करून देण्याची मागणी गावच्या उपसरपंच सौ किरण प्रवीण थेरे यांनी केली आहे.