देशात आजपासून 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे केंद्राकडून मोफत लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी Co-Win अॅपवर नोंदणी करणं अनिवार्य असणार नाही. ज्यामुळे दररोज होणाऱ्या लसीकरणाच्या तुलनेत आता लसीकरणात वाढ होण्याची शक्यता आहे.
लसीसाठी Co-Win अॅपवर पूर्व-नोंदणी करणं अनिवार्य नाही. कारण सरकारने आजपासून स्पॉट नोंदणीसाठी परवानगी दिली आहे. तुम्ही खाजगी दवाखान्यात लस घेणार असला तर कोवॅक्सिन लसीसाठी ₹1,410, कोविशील्ड लसीसाठी ₹790 आणि स्पुतनिक V या लसीसाठी ₹1,145 ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त पैसे देऊ नका.
आज 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यांना एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. सर्वांना मोफत लस देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घेता येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे.