आता प्रत्येक प्रभागात राहणार एक नगरसेवक

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करा

• राज्य निवडूक आयोगाचे आदेश

• नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले

मुंबई : नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात मुदत संपणाऱ्या नगर परिषदच्या निवडणूकसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे लेखी आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे, निवडणूक संचालन नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असून नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम ४१(१) नुसार मुदतपूर्व निवडणूक घेणे गरजेचे आहे. त्यानुसार आता प्रभाग रचना होणार असून यात प्रत्येक प्रभागात १ सदस्य रचना तयार करण्यात येणार असून प्रभाग तयार करताना २०११ ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. कच्चा आराखडा तयार करण्यासाठी २३ ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे त्यासाठी २०११ ची लोकसंख्या, नकाशे विचारात घेतले जाणार आहेत.

प्रभाग रचनेनुसार सदस्य संख्या अंतीम करण्यात येणार असून वाढीव शहर हद्द व इतर भाग यात समाविष्ट केला जाणार आहे. ही सर्व प्रभाग रचना करताना गोपनीयता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभाग रचना तयार झाल्यावर ही माहिती मुख्याधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ कळवायची आहे. प्रभाग रचना, आरक्षण व सोडत कार्यक्रम निवडणूक आयोग यथावकाश कळविणार आहे.