रामदेगी येथील भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारू नये – न्यायालयाचे आदेश

0
297
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : वरोरा ते चिमूर मार्गावरील रामदेगी देवस्थान वन विभागाने ताब्यात घेतल्याने भाविकांना त्या ठिकाणी जाण्याकरीता प्रवेश शुल्क आकारले जात होते. तसेच विश्वस्त मंडळाला तेथे बांधकाम करण्यास मज्जाव करण्यात आला होता. या विरोधात देवस्थान समिती न्यायालयात गेल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

रामदेगी देवस्थान हे प्राचीन काळापासून प्रभु रामचंद्राच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते. येथील शिवमंदिरात नियमित पूजाअर्चा होत असून तेथे मोठी यात्राही भरते. निसर्गरम्य परिसर आणि वन्यप्राण्यांचा वावर यामुळे शासनाने नुकतीच या भागाला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन म्हणून मान्यता दिली, आणि त्याचे एक प्रवेशद्वारही तेथे लावले. त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना आणि पर्यटकांना त्या ठिकाणी जाणे अवघड झाले होते. रामदेगी देवस्थानाचे विश्वस्त हनुमंतराव कार्लेकर यांनी देवस्थानाच्या धर्मशाळेच्या बांधकामाला मंजुरी मिळावी, तेथे सौर ऊर्जा सयंत्र लावण्यास परवानगी द्यावी आणि भाविक भक्तांकडून कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारू नये यासंदर्भातले याचिका वरोरा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली होती. याची दखल घेत दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) गणेश तौर यांनी वनविभागाला स्थगन आदेश देत याचिकाकर्त्यांच्या तीनही मागण्या पुढील आदेशापर्यंत मान्य करण्यास परवानगी दिल्याने येथील धर्मशाळेच्या बांधकामाचा मार्ग सुकर झाला. तसेच भाविक आणि पर्यटकांना येथे जाणे या आदेशामुळे शक्य होणार आहे. एडवोकेट बाबा कारेकर यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहिले.