• आँक्सीजनसाठी प्रशासनाने केले हातवर
चंद्रपूर : वाढती रुग्णसंख्या आणि उपलब्ध साधन सामुग्रीचा कुठेच ताळमेळ नाही. रुग्णालयांना. ‘ऑक्सिजन’ चा पुरवठा करताना प्रशासनाला चांगल्याच धापा लागत आहे. आज जिल्ह्यात तीन खासगी रुग्णालयांना कोविड सेंटरची परवानगी दिली.
मात्र, आम्ही ऑक्सिजन देणार नाही. तुमची सोय तुम्हीच करा, असे सांगून प्रशासनाने हातवर केले. चंद्रपूर जिल्ह्यात आजच्या घडीला २६ खासगी रुग्णालयांना कोरोना बाधितांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरअभावी मृतांच्या संख्येत भर पडत आहे. सध्या जिल्ह्यात १३ हजार १७३ रुग्ण कोरोना बाधित आहे. दुसरीकडे जिल्ह्यात केवळ सहाशे ८८ खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. यात ४५१ सर्वसामान्य, १५२.
अतिदक्षता विभाग आणि ८५ व्हेंटीलेटरशी संलग्नित बेड्स आहे. रुग्ण आणि उपलब्ध खाटांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आणखी काही रुग्णालयांनी कोविड रुग्णालयाची परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकारी परवानगी देताना बऱ्याच नियमांचा किस पाडत आहे. आज बुधवारला चंद्रपुरातील गुरूकृष्टी नेत्रालय , वासाडे नर्सिंग होम आणि चिमूर येथील हिलींग टच मल्टीस्पेशालिटी तीन रुग्णालयाला परवानगी दिली . यात एकूण ५६ बेड्सची व्यवस्था आहे. मात्र, परवानगी देताना जिल्हा प्रशासनाने विचित्र अट टाकली. या रुग्णालयांना ऑक्सिजन या जिल्ह्यातून मिळणार नाही.
संबंधित रुग्णालयांना दुसऱ्या जिल्ह्यातून स्वतःची व्यवस्था करावी, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या परवानगीचा गंभीर रुग्णांना काहीच फायदा होणार नाही. विशेष म्हणजे या आधी दिलेल्या २६ रुग्णालयांच्या परवानगीत ही अट नव्हती. सध्यास्थितीत जिल्ह्यात रोज प्रत्येकी सात हजार लिटरचे सरासरी दोन हजार ६०० ऑक्सिजन सिलिंडरची जिल्हा प्रशासनाची मागणी आहे. आदित्य एक हजार चारशे आणि रूक्मणीकडून एक हजार सिलिंडरचा पुरवठा रोज जिल्हा प्रशासनाला होतो. तो प्रशासनाला कमी पडत आहे. वाढती रुग्णासंख्या बघता ऑक्सिजनची मागणी आणखी वाढणार आहे. मात्र, ऑक्सिजनअभावी प्रशासनाला आताच धापा लागत आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी बिकट होईल.