कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

● आपापल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन   ● गरजूंना आर्थिक मदत

चंद्रपूर : कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे सदर कुटुंबांना आर्थिक मदतसुध्दा देण्यात आली.

यावेळी गडचिरोलीचे जि.प.सदस्य रामभाऊ मेश्राम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप पाटील गड्डमवार, माजी सभापती दिनेश चिटनूरवर, सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार, देवराव भांडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जगावर आलेले कोरोनाचे संकट अतिशय गंभीर आहे. त्याची झळ आपल्या देशाला, राज्याला आणि जिल्ह्यालासुध्दा बसली. अनेकांनी आपले आप्तस्वकीय या महामारीत गमाविले. त्याची भरपाई होऊच शकत नाही. तरीसुध्दा शासन-प्रशासन म्हणून जे काही करणे शक्य होते, त्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मानवी साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नव्हता. या महामारीत अनेकांचा मृत्यू झाला. घरचा कर्ता परुष, महिला यांचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले. लहान मुले पोरकी झाली. हे दु:ख फार मोठे आहे. अशा या संकटाच्यावेळी कुटुंबांना मदत करणे व त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी परिवाराची भेट घेत आहे. गेल्या वर्षी पहिली लाट आली यावर्षी दुसरी लाट आली असून संभाव्य तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे स्वत:सह आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

सावली तालुक्यात कोरोनामुळे एकूण 48 लोकांचा मृत्यू झाला. तसेच लॉकडाऊनमुळे रोजंदारी करणारे नागरीक, सलूनवाले, चहाचे टपरीवाले, चपला तयार करणारे मोची, सुतार आदींना मदत देण्यात आली. कार्यक्रमाला यशवंत बोरकुटे, राजेश सिद्धम, नितीन गोहणे, उषा भोयर, युवराज पाटील, कवडू कुंदावार, नितीन दुवावार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.