पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून त्यांना प्राधान्याने लस द्या : खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर सर्वत्र एक वर्ग नेहमी कार्य करीत राहिला. नेहमी संकटकालीन परिस्थिती व सामान्य जनता यातील दुवा म्हणून पत्रकार कार्य करीत आहे. दुसऱ्या लाटेत देखील हा वर्ग मोठ्या प्रमाणात २४ तास सेवा देत असतो. कुटुंब घरी सोडून ते कार्य करीत आहेत. वृत्तपत्र व टीव्ही पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा देऊन त्यांना त्वरित लस उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

देशात, राज्यात तसेच जिल्ह्यात देखील पत्रकार २४ तास आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये आतापर्यंत शेकडो पत्रकार मृत्यू पावले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील तालुक्यावर काम करणाऱ्या पत्रकारांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. या पत्रकारांच्या मृत्यूने समाजाचीच नाही तर त्या कुटुंबाची देखील भरून न निघणारी हानी होत असते.

जिल्ह्यातील किंवा राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण थांबल्याच्या बातम्या आल्या. केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजन व धोरणामुळे महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी थांबला. कोरोना बाधितांची संख्या व बाधित मृत्यूची संख्या दिवसागणिक वाढत असतांना प्रिंट व इलेक्ट्रानिक मीडियाचे पत्रकार जीवाची बाजी लावून वृत्त संकलन करीत आहेत. अशा परिस्थित पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकारने घेऊन निर्णय घेऊन पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून त्यांना लसीकरण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.