वन अकादमी येथील कोविड रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दया – आ. किशोर जोरगेवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : आमदार निधीतील एक करोड रुपये व उदयोगांच्या सामाजिक दायित्व निधीतून वन आकादमी येथे साकारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाला व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी आज बुधवारी मुंबई येथील मंत्रालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी सदर मागणी केली. चंद्रपूरातील वन अकादमी येथे आमदार निधी व विविध उदयोगांच्या सामाजिक दायित्व निधीतून 200 खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसळली असली तरी संभावित तिस-या लाटेची तयारी म्हणून या रुग्णालयाकडे पाहले जात आहे. तिसरी लाट आल्यास हे रुग्णालय महत्वाचे ठरणार असून येथे आॅक्सिजन युक्त खाटांची, आॅक्सिजन साठविण्यासाठी टाकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र येथे व्हेंटीलेटरचा अभाव आहे. त्यामूळे सदर रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध व्हावे या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. दरम्याण आज त्यांनी मुंबई येथील मंत्रालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली असून या बाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. ना. राजेश टोपे यांनीही याबाबत साकारत्मकता दाखवली असून सदर रुग्णालयाला व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.